‘आपल्या घरावर तिरंगा कसा लावावा’

278

– जिल्हा प्रशासनामार्फत चित्रफित जारी
The गडविश्व
नागपूर , २२ जुलै : १३ ते १५ ऑगस्ट या काळात जिल्ह्यातील प्रत्येक घरावर तिरंगा डौलाने फडकावा यासाठी जिल्हा प्रशासन जोमाने कार्यरत असून या संदर्भातील जिल्हा प्रशासनाची अधिकृत चित्रफीत समाज माध्यमांवरून जिल्हाधिकारी आर. विमला व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जारी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या गटविकास अधिकारी नागपूर यांच्या सौजन्याने, जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकारात निर्माण करण्यात आलेल्या या चित्रफितीचे अनावरण जिल्हाधिकारी आर. विमला व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. ही चित्रफीत विभागीय आयुक्त माधवी खोडे चवरे यांच्या मार्गदर्शनात तयार करण्यात आली असून संपूर्ण विभागात चित्रफितीचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.

अशी आहे ध्वज संहिता

चित्रफितीमध्ये ध्वज संहिता अधोरेखित करण्यात आली आहे. ध्वजसंहितेनुसारआपला राष्ट्रध्वज हा हाताने कातलेला किंवा विणलेला अथवा मशीनद्वारे तयार केलेला असावा, सूत, पॉलिस्टर, सिल्क, खादी किंवा लोकरी पासून तयार केलेला तिरंगा चालेल. प्लास्टिक किंवा कागदी झेंडा फडकवू नये. राष्ट्रध्वजाचा अर्थात तिरंगाचा आकार हा आयताकृती असेल. तसेच त्याची ठेवन ३:२ या प्रमाणात ठेवावी. ध्वज फडकवितांना हवामान कसेही असले तरी तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकावा. म्हणजेच १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या तीनही दिवशी रोज सकाळी फडकवावा आणि सूर्यास्ता वेळी रोज उतरावा. घरी लावलेल्या झेंड्याबाबतही हे आवश्यक आहे. राष्ट्रध्वज उतरवल्यानंतर व्यवस्थित आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावा. तिरंगा फडकवताना नेहमी झेंड्यातील केशरी रंग हा वरच्या बाजूने आणि हिरवा रंग हा जमिनीच्या बाजूने राहील याची काळजी घ्यावी. यात चूक केल्यास तो तिरंग्याचा अवमान समजण्यात येतो. राष्ट्रीय ध्वज लावताना स्तंभाच्या वरच्या टोकावर लावावा. त्याला स्तंभाच्या मध्ये अगर खाली किंवा इतरत्र लावू नये.राष्ट्रध्वज लावताना,इतर सजावटी वस्तू लावू नये, केवळ फडकवण्याआधी त्यात फुलं किंवा पाकळ्या ठेवण्यास मनाई नाही, तसेच राष्ट्रध्वज उतरवताना पूर्ण सावधानतेने आणि सन्मानाने हळूहळू उतरवावा. ध्वजावर कोणते प्रकारचे अक्षर चिन्ह लावू नये. तसेच ध्वज स्तंभाच्यावर अथवा आजूबाजूला काही लावू नये, ध्वज जमिनीपासून उंचावर लावावा. ध्वज जाणून-बुजून जमिनीवर अगर पाण्यामध्ये बुडणार नाही अशा पद्धतीने लावावा. राष्ट्रीय ध्वजाचा वापर व्यवसायाकरिता करता येत नाही. तसेच त्याची अवहेलनाही करणं दंडणीय अपराध आहे. त्यामुळे ध्वजाचा उपयोग गाडीवर झाकणे, इमारतीवर झाकणे, टेबलवर टेबल क्लॉथ प्रमाणे टाकणे, ध्वजाच्या कोणत्याही प्रकारच्या पोशाखाचा अथवा गणवेशाचा भाग म्हणून वापर करणे येणार ध्वजाचा रुमाल, उशी कींवा शर्ट आदींवर किंवा कोणत्याही पोशाख साहित्यावर भरतकाम किंवा छपाई करणे चुकीचे आहे. राष्ट्रध्वज कुठल्याही प्रकारे फाटलेला, मळलेला अथवा चुरगळलेला लावण्यात येऊ नये. तसेच तो एकाच वेळी इतर ध्वजासोबत एकाच काठीवर फडकवू नये. ज्या स्तंभावर राष्ट्रध्वज फडकवायचा आहे, त्या काठीवर वा स्तंभावर ध्वजाच्या टोकावर फुले किंवा हार यासारखी कोणतीही वस्तू, बोधचिन्ह ठेवू नये. राष्ट्रध्वजाच्या कोणत्याही प्रकारे तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे शोभेसाठी उपयोग करू नये. राष्ट्रीय ध्वज उभारताना तो कोणत्याही पद्धतीने फाटणार नाही, याची काळजी घ्यावी.आपला राष्ट्रध्वज तिरंगा हा आपला अभिमान आहे. आपली अस्मिता आहे. त्याचा कुठल्याही प्रकारे अनादर होईल अशा प्रकारे कृत्य करू नये. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपल्या घराघरात हा ध्वज लावायचा आहे. त्यामुळे ही ध्वज संहिता पाळण्यात यावी,असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here