आजपासून राज्यात प्लास्टिक कोटेड वस्तूंवर तात्काळ बंदी

1178

The गडविश्व
मुंबई, २७ जुलै : आजपासून राज्यात प्लास्टिक कोटेड वस्तूंवर तात्काळ बंदी लागू करण्यात आली आहे. प्लास्टिकचे कोटींग असलेले कप, ग्लास, चमचे, कंटेनर्स यावर आजपासून बंदी करण्यात आली आहे. केंद्राने याआधीच सिंगल युज प्लास्टिकवर बंदी लागू केली आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यात समिती स्थापन झाली होती. या समितीच्या शिफारसींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने परवानगी दिली आहे. (Maharashtra Government bans plastic-coated, laminated goods)
केंद्र शासनाने १ जुलै २०२२ पासून सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घातली असून राज्यात या बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र हे सिंगल युज प्लास्टिक बंदी करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
राज्यात प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक शक्तिप्रदत्त समिती नेमण्यात आली होती. या समितीने ७ जुलै २०२२ रोजीच्या बैठकीत महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकॉल उत्पादने अधिसूचना २०१८ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्य शासनाने १५ जुलै २०२२ रोजीच्या अधिसूचनेद्वारे प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर देखील बंदी घातली आहे. या सुधारणेनंतर राज्यात प्लास्टिक लेपीत (Coating) तसेच प्लॅस्टिक थर (Laminated) असणाऱ्या पेपर किंवा ॲल्युमिनियम इत्यादी पासून बनवलेले डीस्पोजेबल डीश, कप, प्लेट्स, ग्लासेस, काटा, वाडगा, कंटेनर इत्यादी एकल वापरावर, वापर उत्पादनावर आता बंदी असणार आहे. दैनंदिन कचऱ्यातील प्लास्टिकचा कचरा कमी करणे हा बंदीमागचा मुख्य उद्देश आहे.
राज्यातील शहरे, ग्रामीण भागात दैनंदिन कचऱ्यातील प्लास्टिकचे प्रमाण लक्षणीय असून, यातील कचऱ्याचे विघटन व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. हा कचरा जलाशयांमध्ये व कचरा डेपोत फेकला जातो किंवा पुनर्प्रक्रिया शक्य नसल्याने रात्रीच्या वेळी हा कचरा थेट जाळला जातो.
सध्या राज्यात सिंगल युज प्लास्टिक मध्ये कप, प्लेट्स, वाडगा, चमचे, कंटेनर इत्यादींच्या वापरावर बंदी आहे. परंतु सध्या बाजारामध्ये डीश, कंटेनर, ग्लास, कप इत्यादी पेपरच्या नावाखाली प्लास्टिक लेप असलेले किंवा प्लास्टिक लॅमिनेशन केलेले मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. या सर्व वस्तुंमध्ये सुद्धा प्लास्टिक आहे. विघटनास घातक ठरणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकचे आक्रमण रोखण्यासाठी हे बंदीचे पाऊल उचलण्यात आले आहे.
#Ban on plastic coated items

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here