५८ विक्रेत्यांचे गाव झाले ‘अवैध दारूविक्रीमुक्त’

549

पोलिस विभागाच्या सहकार्याने मुक्तीपथचे यशस्वी प्रयत्न
The गडविश्व
गडचिरोली, ४ नोव्हेंबर : तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर वसलेल्या रानमूल गावात एकेकाळी ६० पैकी ५८ कुटुंब अवैध दारूविक्रीचा व्यवसाय करीत होते. सद्यस्थितीत हे गाव दारूविक्रीमुक्ती गाव म्हणून नावारूपास आले आहे. यासाठी पोलिस विभागाच्या सहकार्याने मुक्तीपथने केलेल्या अथक प्रयत्नांना यश आले आहे. आता वर्षभराचा कालावधी लोटूनही एकाही घरातून दारूविक्री केली जात नाही.

रानमूल गावात संपूर्ण आदिवासी समुदाय निवासी असून लोकसंख्या जवळपास २०० एवढी आहे. गावाला लागूनच नदी-नाले व जंगलपरिसर असल्याने अनेक विक्रेते हातभट्टी लावून दारू गाळीत होते. या गावातून जिल्हा मुख्यालयासह तालुक्यातील काही गावातील किरकोळ विक्रेत्यांना दारूचा पुरवठा केला जात होता. हा अवैध व्यवसाय थांबविण्यासाठी मुक्तीपथने गाव सभेचे आयोजन करून दारूविक्री बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु, गावात रोजगार नसल्याने आम्ही दारूविक्री चा व्यवसाय बंद करणार नाही, असे मत गावातील विक्रेत्यांनी मांडले. अशातच पोलिस विभाग व मुक्तीपथने दारूविक्रेत्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारत मोहफुलचा सडवा, दारू, साहित्य नष्ट केले व दारूविक्रेत्यांवर गुन्हे देखील दाखल केले. यामुळे दारूविक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली व गावकऱ्यांनी कोणीही दारू विक्री करणार नाही असे ठरविले. दुसऱ्या दिवशी मुक्तीपथ ने गावात बैठक घेऊन दारूविक्रीचे तोटे समजावून सांगितले. मात्र काही विक्रेत्यांनी यास विरोध दर्शविला. त्यानंतर पोलिस निरीक्षक यांच्या उपस्थितीत गाव सभा घेऊन जो कोणी दारूविक्री करणार त्याच्यावर आणखी गुन्हा दाखल होईल व कारवाई केली जाईल असे ठणकावून सांगण्यात आले.

पोलिस निरीक्षक व मुक्तीपथ कार्यकर्त्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत गावकऱ्यांनी दारूविक्रीचा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला व अंमलबजावणी देखील केली. आता वर्षभराचा काळावधी पूर्ण होऊनहू गावातील एकाही घरातून दारूविक्री केली जात नाही. अशाप्रकारे दारूविक्रीसाठी प्रसिद्ध असलेले गडचिरोली तालुक्यातील रानमुल हे गाव आजच्या स्थितीत दारूविक्रीमुक्त झाले  आहे.

आता ही दारूबंदी टिकविण्यासाठी मुक्तीपथ व गावकऱ्यांच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. व्यसन उपचार शिबीर घेऊन व्यसनी रुग्णांना उपचार दिले जात आहे. सोबतच नुकतीच गावात पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत सर्व गावकऱ्यांनी उपस्थिती दर्शवित एकी दाखवली. विशेष म्हणजे, गावातील युवक रोजगाराच्या शोधात इतरत्र न भटकता गावातच कामे करून आनंदाने राहत आहेत. गावातून दारू हद्दपार झाल्याने गावात शांततेचे वातावरण आहे. ज्या गावात ६० पैकी ५८ कुटुंब दारूविक्रीचा व्यवसाय करीत होते ते दारूविक्रीमुक्त गाव म्हणून नावारूपास आले आहे. या गावाचा आदर्श घेत इतरही गावांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here