-गडचिरोली पोलिसांची कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, २१ ऑक्टोबर : तालुक्यातील रानभुमी व लगतच्या धानोरा तालुक्यातील सीताटोला जंगल परिसरात धाड टाकून चार हातभट्ट्या उध्वस्त करीत जवळपास ५ लाखाचा मुद्देमाल नष्ट केल्याची कारवाई गडचिरोली पोलिस, गडचिरोली व धानोरा मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या गुरुवारी केली.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दारूविक्रेत्यांनी दारू गाळण्यासाठी धानोरा तालुक्यातील सीताटोला-जांभळी व गडचिरोली तालुक्यातील राणभूमी जंगलपरिसरात मोहफुलाचा सडवा टाकला असल्याची माहिती मिळाली. या परिसरात धाड टाकून कारवाई करण्याच्या उद्देशाने समनव्य बैठक घेऊन नियोजन करण्यात आले. त्यानुसार गडचिरोली पोलिस, गडचिरोली व धानोरा मुक्तिपथ तालुका चमूने सीताटोला-जांभळी व राणभूमी जंगलपरिसरात शोधमोहीम राबविली. यावेळी चार हातभट्ट्या नष्ट करण्यात आल्या. सोबतच २७ क्विंटल मोहफुलाचा सडवा, ४२ ड्रम, १८ केटल्या व इतर साहित्य नष्ट करण्यात आल्या. ही कारवाई गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवदास दुर्गे यांनी केली. यावेळी मुक्तिपथ तालुका प्रतिनिधी अमोल वाकुडकर, रेवनाथ मेश्राम, स्विटी आकरे, अक्षय पेद्दीवार, भास्कर कड्यामी, राहुल महाकुलकर उपस्थित होते.