– सिरोंचा पोलिसांची कारवाई
The गडविश्व
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथील दोन घरांतून १ लाख ६७ हजार रुपये किंमतीचा २४ ड्रम गुळाचा सडवा व साहित्य नष्ट केल्याची कारवाई सिरोंचा पोलीस, मुक्तिपथ तालुका चमू व गावसंघटनेने संयुक्तरित्या गुरुवारी केली. याप्रकरणी दोघांवर सिरोंचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिरोंचा तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या पोचमपल्ली गावात अवैध दारूविक्री बंद होती. मात्र, गावातील काही विक्रेत्यांनी नव्याने दारूची अवैधरित्या विक्री सुरु केली आहे. या गावातून तालुक्यांतील काही गावांसह तेलंगणा राज्यात सुद्धा अवैध दारूचा पुरवठा केला जातो. गावात दारू गाळण्यासाठी घर परिसरात गुळाचा सडवा टाकला असल्याची माहिती मिळताच सिरोंचा पोलीस, मुक्तिपथ तालुका चमू व गावसंघटनेने संयुक्तरित्या दोन घरी धाड टाकली. दरम्यान एका घरी २१ ड्रम व दुसऱ्या घरी ३ ड्रम असा एकूण १ लाख ६७ हजारांचा २४ ड्रम गुळाचा सडवा, दारू गाळण्याचे साहित्य मिळून आले. संपूर्ण मुद्देमाल नष्ट करीत दोघांवर सिरोंचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार राजू चव्हाण व पोलिस पथकाने केली. यावेळी मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेचे सदस्य उपस्थित होते.