– खुनाच्या गुन्हयात आजन्म कारावासाची शिक्षा नागपूर कारागृहात भोगत असतांना झाले होते फरार
The गडविश्व
वर्धा : खुनाच्या गुन्हयात आजन्म कारावासाची शिक्षा नागपूर कारागृहात भोगत असतांना संचीत रजेवर गेले असता १४ वर्षापासून फरार असलेल्या आरोपींच्या वर्धा पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहे. सुनिल उर्फ सनी रमेशचंद्र झाडे (३७), राहुल रमेशचंद्र झाडे (३९) दोन्ही राहणार साईनगर वर्धा असे आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी हे नागपूर कारागृहात खुनाच्या गुन्हात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत होते. दरम्यान २००८ साली दोघेही संचीत रजेवर गेले पंरतु रजेचा कालावधी संपुनही कारागृहात परतले नाही. तेव्हापासून ते फरार असल्याने आरोपी सुनिल उर्फ सनी रमेशचंद्र झाडे (३७) याच्याविरूध्द पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे व आरोपी राहुल रमेशचंद्र झाडे (३९) रा. साईनगर वर्धा हल्ली मुक्काम पोद्दार सोसायटी, बदलापूर जि. ठाणे यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले होते. तर या अरोपींना वर्धा जिल्हा फरार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले होते.
सदर आरोपींचा शोध घेणे सुरू होते. दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दोनही आरोपींना पोद्दार सोसायटी, बदलापूर जि. ठाणे येथून काल २२ मार्च रोजी ताब्यात घेवून पोलीस स्टेशन वर्धा शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाई पेालीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळके यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, समोनि महेंद्र इंगळे यांच्या निर्देशाप्रमाणे पोउपनि सौरभ घरडे, पोउपनि गोपाल ढोले, पेालीस अंमलदार संतोष दरगुडे, हमीद शेख, दिपक जाधव, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, राजेश तिवसकर, संघसेन कांबळे, विकास अवचट, राकेश आष्टणकर यांनी केली.