१३३ कोटींच्या बनावट खरेदी बिलांचा वापर करुन इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्यासंदर्भात दोन व्यक्तींना अटक

327

The गडविश्व
मुंबई : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने धडक कारवाईद्वारे १३३.६८ कोटीच्या रुपयांच्या खोटया बिलांद्वारे शासनाची १९.९३ कोटी रुपयांची महसूल हानी करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक केली आहे.
मे. देवराम ट्रेडर्स व मे. अपोलो एंटरप्राईज या व्यापा-यांच्या उल्हासनगर व नालासोपारा येथील ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून करचोरी विरोधी दि. २७ मे २०२२ रोजी विशेष अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती, अन्वेषण भेटी दरम्यान या व्यापाऱ्यांनी बनावट वीजबिल, आधार आणि पॅनकार्ड द्वारे नोंदणी प्रमाणपत्र घेतल्याचे आढळून आले. वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलांसंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहीमेअंतर्गत संबंधित कंपन्यांचे मालक अनिल देवराम जाधव व संतोष अशोक शिंदे यांना दि. २७ मे २०२२ रोजी अटक करण्यात आली.
महानगर दंडाधिकाऱ्यांनी काल २७ मे २०२२ रोजी या दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ही धडक कारवाई राज्यकर सहआयुक्त, (अन्वेषण-अ, मुंबई) राहुल द्विवेदी (भा.प्र.से.) व राज्यकर उप आयुक्त संजय वि. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक राज्यकर आयुक्त नंदकुमार दिये व रविकांत कांबळे यांनी केली.
या मोहिमेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाद्वारे या आर्थिक वर्षात आतापर्यंत एकूण सोळा जणांना अटक केले आहे. सर्वसमावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करून आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग कर चुकवणा-या व्यापा-यांचा शोध घेत असल्याने अटक कारवायांच्या वाढत्या संख्येदवारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणा-यांस कडक इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here