– जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे मागणी
The गडविश्व
गडचिरोली : tech जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती चामोर्शी व मुलचेरा येथील हिंदी माध्यमांच्या एकंदरीत 48 शाळा आहेत. आजही या शाळांमध्ये प्रथम भाषा हिंदी व अन्य सर्व विषयसुद्धा हिंदी भाषेतूनच शिकवल्या जातात. तसेच या शाळांमध्ये शिकवण्याकरिता सन 2007 व 2009 मध्ये प्रथम भाषा हिंदी व हिंदी माध्यमातील अन्य विषय शिकवण्याकरिता हिंदी भाषा नियमित उत्तीर्ण शिक्षकांची भरती करण्यात आली होती. मात्र सदर 48 शाळेवर महाराष्ट्र शासनाचा व जिल्हा परिषद गडचिरोली यांचे कोणतेही आदेश किंवा परिपत्रक नसून द्वितीय भाषा म्हणून बांगला भाषा शिकवल्या जात आहे. वर्ग 5 ते 7 ला हि द्वितीय भाषा बांग्ला शिकवण्याकरिता सन 2009 मध्ये बांगला भाषा अवगत असणाऱ्या 47 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून तसा उल्लेखसुद्धा त्यांच्या प्रथम नियुक्तीचे आदेशावर करण्यात आलेला आहे. परंतु या हिंदी माध्यमांच्या शाळेवर सण 2017 मध्ये पदोन्नती देताना प्रथम भाषा हिंदी शिकवणाऱ्या शिक्षकांना बगल देऊन हिंदी माध्यमाच्या शिक्षकांना नियुक्ती न देता त्यांना मराठी शाळेवर समायोजित करून प्रथम भाषा हिंदी शिकवण्यासाठी नियमित बांगला भाषा उत्तीर्ण नसणाऱ्या शिक्षकांना हिंदी शिक्षक दाखवून पदवीधर म्हणून नियुक्त करण्यात आले. हा हिंदी माध्यम शिक्षकांवर झालेला अन्याय आहे. हा अन्याय दूर करण्यात यावा अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे अन्यायग्रस्त हिंदी माध्यम शिक्षकांकडून करण्यात आली आहे.
या प्रकरणात काही पदाधिकारी व अधिकारी तसेच काही शिक्षकांनी जिल्हा परिषद प्रशासनाची दिशाभूल करून कोणत्याही नियम व निकषाचा अवलंब न करता इयत्ता सहावी ते आठवी वर अध्यापन करण्यासाठी नियमित बांगला भाषा उत्तीर्ण नसणाऱ्या शिक्षकांना पदवीधर शिक्षक म्हणून पदोन्नती दिली.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पदवीधर शिक्षकांची नियुक्ती करताना शिक्षकांच्या माध्यमाचा विचार करून माध्यम निहाय पदोन्नती देण्यात आली. जसे की जवळच्या गोंदिया व नागपूर जिल्ह्यात हिंदी माध्यमाच्या शिक्षकांना हिंदी माध्यमाच्या शाळेवर पदोन्नती नियुक्ती देण्यात आली. परंतु गडचिरोली जिल्हा परिषदमध्ये पदोन्नतीचे सर्व नियम धाब्यावर बसवून एक विशेष समाजाच्या लोकांना सन 2017 मध्ये प्राधान्य देण्यात आले. ही बाब हिंदी माध्यम शिक्षक कृती समितीने जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निर्देशानुसार आणून दिली. तसेच राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोग दिल्ली यांनी देखील हिंदी माध्यमांच्या शिक्षकावर अन्याय होत असल्याची बाब कबूल केली असून त्वरित हिंदी माध्यमाच्या शिक्षकांना न्याय देण्यात यावे असे गडचिरोली जिल्हा परिषदेला सुचविण्यात आले.
तेव्हा जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत हिंदी शाळेवर हिंदी माध्यमाच्या शिक्षकांना पदोन्नतीने सामावून घेऊन त्यांच्या झालेला अन्याय रितसर दूर करण्यात यावा. अशी मागणी हिंदी माध्यमाच्या शिक्षक कृती समितीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे करून त्वरीत न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.