स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा

378

The गडविश्व
गडचिरोली : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरविणे बाबतच्या योजनेत आमुलाग्र बदल करण्यात आला असून सदर योजनेअंतर्गत लाभार्थी बचत गटांना देण्यात येणारे अर्थसहाय्य हे वस्तु स्वरुपात न देता मंजूर अर्थसहाय्यची जास्तीत जास्त रक्कम रुपये 3.15 लाख बचत गटांच्या आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या योजनेच्या अटी व शर्ती मध्ये स्वयंसहाय्यता बचत गटातील सर्व सदस्य हे महाराष्ट्राचे रहिवासी असावे.
स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत, स्वंयसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत, बचत गटाचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते असावे व सदरचे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे आधार क्रमांकाशी संलग्न केलेले असावे. स्वयंसहाय्यता बचत गटातील सर्व सदस्यांचे आधार ओळखपत्र आवश्यक आहे तसेच सर्व सदस्यांचा 7/12 चा उतारा असणे आवश्यक आहे. स्वयंसहाय्यता बचत गटाने खरेदी केलेल्या ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ही भारत सरकारच्या कृषी विभागाकडून निर्धारित केल्यानुसार फॉर्म, मशिनरी, ट्रेनिंग आणि टेस्टींग इन्स्टीटयूट यांनी टेस्ट करुन जाहीर केलेल्या उत्पादकांच्या यादीतील परिमाणानुसार असावेत. पात्र बचत गटांना शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार अर्थसहाय्य मंजूर करुन त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
योजनेच्या लाभासाठी निवड झालेल्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्याला त्यांनी खरेदी केलेले मिनी ट्रॅक्टर चालविण्याचे अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण घेऊन त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.गटाने खरेदी केलेले मिनीट्रॅक्टर / ट्रॅक्टर व उपसाधने अर्थसहाय्य घेतल्यानंतर विकता येणार नाही किंवा गहाण ठेवता येणार नाही. तशा आशयाचे हमीपत्र स्वंयसहाय्यता बचत गटाला दरवर्षी 10 वर्षापर्यंत द्यावे लागेल. याअगोदर स्वयंसहाय्यता बचत गटांनी पावर टिलर किंवा मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतला आहे, त्या बचत गटांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र स्वयंसहाय्यता बचत गटांनी अधिक माहिती करिता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, गडचिरोली कार्यालयाशी संपर्क साधावा,संपर्क क्रमांक 07132-222192,असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here