-तहसीलदार ओंकार ओतारी यांचे निर्देश
The गडविश्व
गडचिरोली : मुख कर्क रोग होण्याचे मुख्य कारण तंबाखु आहे. त्यामुळे तालुका पातळीवर पथक तयार करून प्रत्येक शाळांच्या 200 मिटर परिक्षेत्रात तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करून दुकाने बंद करावीत. तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्रीस आळा घालण्याचे निर्देश तहसीलदार ओंकार ओतारी यांनी संबंधितांना दिले.
अहेरी तहसिल कार्यालयातील सभागृहात राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम तथा तंबाखु व दारूमुक्त जिल्हा विकास कार्यक्रम अंतर्गत आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी पोलीस निरिक्षक श्याम गव्हाणे, संवर्ग विकास अधिकारी प्रतिक चन्नावार, गट शिक्षण अधिकारी यांचे प्रतिनिधी ताराचंद भुरसे, उमेदचे गंगाधर डोर्लीकर, महिला आर्थिक विकास महामंडळाचे प्रतिनिधी दिपक फुलारे, पोहवा दिगंबर गलबले, मुक्तिपथ तालुका संघटक केशव चव्हाण, तालुका प्रेरक आनंदराव कुम्मरी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेचे इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले व तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली. तसेच कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यासह विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. शहरातील पानटप-यावर पोलीस विभागाच्या मदतीने धाडी टाकण्याचे व अतिक्रमण जागेवरील पानटप-या हटविण्याचे तहसीलदारांनी निर्देश दिले. मुक्तिपथ तालुका संघटक केशव चव्हाण यांनी कोटपा कायदा 2003 व अन्न व प्रशासन कायदा अंतर्गत माहिती दिली. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करतांना व शासकीय कार्यालयात नागरीक, कर्मचारी तंबाखुजन्य पदार्थ सेवन करतांना आढळल्यास 200 रुपये दंड आकारण्याचे निर्देश देण्यात आले. खर्रा तंबाखुमुक्त कार्यालय असे फलक कार्यालयाचे दर्शनी भागावर लावणे. तसेच 18 वर्षाखालील व्यक्तीस तंबाखुपदार्थ विक्री करणे किंवा या वयाच्या व्यक्तीव्दारे विक्री करणे याकरीता 7 वर्षाची शिक्षा व 1 लक्ष रूपये दंड एवढी शिक्षा होऊ शकते याबाबतही बैठकीत माहिती देण्यात आली.