– वाघाचा शोध घेणे सुरू, जखमी अवस्थेत वाघ फिरत असल्याची माहिती
The गडविश्व
यवतमाळ : तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने लावण्यात आलेल्या तारांच्या जाळ्यात एक वाघ अडकल्याची माहिती आहे. यावेळी वाघाने संघर्ष करीत त्या ताराचे जाळे तोडून त्यातून आपली सुटका करीत पळ काढला मात्र पण या संघर्षात त्या वाघाच्या गळ्यात जाळ्याची तार अडकल्याने तो जखमी झाल्याचे कळते. गळ्यात अडकलेली ती तार घेऊनच हा वाघ जखमी अवस्थेत अभयारण्यात फिरत असल्याची माहिती आहे. तर या जखमी वाघाच्या गळ्यातील तारांचा फास काढण्यासाठी अमरावती येथील बचाव पथक सुमारे आठ दिवसांपासून या अभयारण्यात गस्त घालत आहे.
टिपेश्वर अभयारण्यातील वन्य प्राण्यांची नेहमीच शिकार करण्यात येते असल्याचे घटना अनेकदा घडल्या आहेत. गेल्या आठ दिवसांआधी एका पर्यटकाला अभयारण्यातील वाघाच्या गळ्यात तार अडकल्याचे दिसून आले. याची माहिती टिपेश्वरच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. तसेच अभयारण्यात लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्येसुद्धा एका वाघाच्या गळ्यात तार अडकल्याचे दिसून आल्याची माहिती आहे. टिपेश्वरच्या पाटणबोरी रेजंमधील एदलापूर व पिलखान बिटमध्ये हा जखमी वाघ आढळून आला होता. त्याचा वावरदेखील या दोन बिटांतच आहे. परंतु, अद्यापही बचाव पथकाच्या हाती तो लागलेला नाही. वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी जाळे लावण्यात आलेल्या जाळ्यात तो वाघ अडकला. याबाबत माहिती मिळताच, अभयारण्याच्या अधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या असून जखमी वाघाचा शोढे घेणे सुरू असल्याचे कळते.