– गडचिरोली प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय शुक्ल यांचा न्यायनिर्वाळा
The गडविश्व
गडचिरोली, २१ नोव्हेंबर : मनोरुग्ण मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय शुक्ल यांनी १० वर्ष सश्रम कारावास व २० हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडित ही मनोरुग्ण असून ती शिक्षण घेत होती मात्र काही वर्षांपासून घरीच राहत दिवसभर गावात कुठेही फिरत राहत होती. यादरम्यान २८ जानेवारी २०२१ रोजी आशा वर्कर यांनी पीडित गर्भवती असल्याचे तसेच तिला डॉक्टरकडे तपासणी करण्याकरिता सांगितले, पीडितेची सोनोग्राफी करून डॉक्टरांना सोनोग्राफी दाखविले असता ५ महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. यावेळी फिर्यादी व पीडितेच्या भावाने गर्भ ठेवायचा नाही असे सांगितल्यावर डॉक्टरांनी तिला नागपूर येथील शासकीय महाविद्यालयात नेण्यास सांगितले व कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पीडितेवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केले अशा बायनावरून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांच्या आदेशाने पीडित मुलीचे गर्भपात करण्यात आले व पीडित तसेच तिच्या गर्भाचे नमुने डी.एन.ए परिक्षनाकरिता रासायनिक विश्लेषण यांच्याकडे पाठविण्यात आले व पीडितेला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळताच विशेष शिक्षकांच्या मदतीने पीडितेचे बयाण नोंदविले असता पीडितेने तिच्यावर अत्याचार करणाऱ्याचे नाव सांगितले. आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन देसाईगंज येथे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषरोप पत्र दाखल करण्यात आले. फिर्यादी व वैद्यकीय पुरावा, इतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून आज २१ नोव्हेंबर २०२२ रोजी आरोपीस गडचिरोली प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी कलम ३७६(२)(जे) (एल) भा.दं.वि कायद्यानव्ये दोषी ठरवत १० वर्ष सश्रम कारावास व २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. द्रव्यदंडापैकी १५ हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून पीडितेला देण्याचे आदेश देण्यात आले.
#gadchiroli #crimenews #gadchirolinews #gadchirolicort