लम्पी आजार : गडचिरोली जिल्हा ‘नियंत्रित क्षेत्र, गोजातीय प्रजातीची गुरे व म्हशींचा प्राणी बाजार भरवण्यास मनाई

317

– लम्पी आजाराबाबत संबधितांनी सतर्कता बाळगून नियमांचे पालन करावे : जिल्हाधिकारी संजय मीणा
The गडविश्व
गडचिरोली (Gadchiroli) १३ सप्टेंबर : महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हयांमध्ये गाय वर्गीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव (Lumpy skin disease ) झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सद्यास्थितीत गडचिरोली जिल्हयात सदर रोगाचा प्रादुर्भाव झालेला नाही. प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ अन्वये अधिसुचना केलेल्या रोगामध्ये लम्पी चर्मरोग या रोगाचा अनुसूचित रोग म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. तसेच लम्पी चर्मरोगाचा फैलाव बाह्य किटकाव्दारे (मच्छर, गोचीड, गोमाश्या) तसेच आजारी पशुंच्या त्वचेवरील व्रणा मधून वाहणारा स्त्राव, नाकातील स्त्राव, दुध, लाळ, वीर्य व इतर स्त्रावामुळे होत असल्याने पशुपालकांनी मच्छर, गोचीड व गोमाश्या यांचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. यानुसार आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोली यांनी याबाबत आदेश निर्गमित केले आहेत. लम्पी आजाराबाबत शेतकरी, मालक, पशुसंवर्धन व संबंधित सर्वच व्यक्ति व आस्थापनांनी याबाबत सतर्कता बाळगून नियमांचे पालन करावे याप्रकारचे आदेश जिल्हाधिकारी संजय मीणा (gadchiroli collector sanjay mina) यांनी दिले आहेत.

लम्पी चर्मरोग बाधित पशुमध्ये दिसून येणारी लक्षणे पाहता या आजारात पशुंना ताप येणे, पुर्ण शरीरावर १०-१५ मी.मी. व्यासाच्या कडक गाठी येणे, तोंड नाक व डोळयात व्रण निर्माण होणे, चारा चघळण्यास त्रास होणे, अशक्तपणा, भुक कमी होणे, वजन कमी होणे, दुध उत्पादन कमी होणे, डोळयातील व्रणामुळे दृष्टी बाधीत होणे, काही वेळा फुफुसदाह किंवा स्तनदाह होणे, पायावर सुज येऊन लंगडणे, गाभण जनावरामध्ये गर्भपात होणे अशी लक्षणे दिसुन येतात. या रोगाने बाधित जनावरे दोन-तीन आवठडयात बरी होतात.

या रोगाची लक्षणे पशुमध्ये आढळुन आल्यास प्रत्येक व्यक्ती / अशासकीय संस्था / संबधीत स्थानीक स्वराज्य संस्था इ. यांनी प्राण्यामंधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियत्रंण अधिनियम २००९ मधील कलम ४ (१) अन्वये लेखी स्वरुपात नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेत तात्काळ कळविणे बंधनकारक आहे. यामध्ये दिरंगाई केल्यास प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियत्रंण अधिनियम, २००९ मधील कलम ३२ येथील नमुद तरतुदीनुसार संबधीत खाजगी पशुवैद्यक, पशु व्यापारी, वाहतुकदार विरुध्द गुन्हा नोंद केला जावु शकतो याची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी. एका राज्यातुन दुसऱ्या राज्यात/एका जिल्हयातुन दुसऱ्या जिल्हयात बाधित जनावरांची वाहतुक केल्यामुळे बाधित जनावरापासुन निरोगी जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. सदर रोग हा सांसर्गीक असल्याने या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना तात्काळ अमलात आणणे आवश्यक आहे.
त्या नुसार संजय मीणा (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, गडचिरोली तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, गडचिरोली यांनी प्राण्यामंधील संक्रामक व सांसर्गीक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ व महाराष्ट्र शासन अधिसुचना अन्वये प्राप्त अधिकारान्वये लम्पी चर्मरोग या रोगाचा अनुसूचित रोगाचा प्रतिबंध, नियंत्रण व निर्मुलन करण्यासाठी गडचिरोली जिल्हा १२ सप्टेंबर २०२२ पासून “नियंत्रित क्षेत्र” म्हणून घोषित केलेले आहे. त्या नुसार जिल्हयातील गोजातीय प्रजातीची सर्व गुरे व म्हशी यांची अन्य कोणत्याही ठिकाणी ने- आण करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
तसेच गोजातीय प्रजातीची गुरे व म्हशीची कोणताही प्राणी बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरविणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजीत करणे आणि नियंत्रीत क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करुन किंवा त्यांना एकत्रित करुन कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास मनाई करण्यात येत आहे. उक्त नियंत्रीत क्षेत्रामधील बाजार पेठेत, जत्रेत किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनीक ठिकाणी, गोजातीय प्रजाती प्राण्यांच्या उक्त बाधीत झालेल्या गुरांना व म्हशीना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करणे यास मनाई करण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here