– पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची माहिती
The गडविश्व
मुंबई, २० सप्टेंबर : राज्यातील पशुसंवर्धन विभागाला दिलेल्या सूचना, मनुष्यबळ वाढ, पुरेशा लसमात्रा, पशुधनावर करण्यात आलेले उपचार आणि निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने राज्यातील लम्पी आजार आटोक्यात येत आहे. 3 हजार 291 जनावरे औषधोपचारामुळे ठीक झाल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
सिंह म्हणाले, राज्यात दि. १९ सप्टेंबर २०२२ अखेर जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, परभणी, सोलापूर, वाशिम, नाशिक, जालना, पालघर, ठाणे, नांदेड, नागपूर, चंद्रपूर, हिंगोली व रायगड अशा 27 जिल्ह्यांमधील 1108 गावांमध्ये 9 हजार 375 जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधितांपैकी 3 हजार 291 जनावरे बरी झाली असून, उर्वरितांवर उपचार सुरु आहेत.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 49.83 लाख लसीच्या मात्रा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या लस मात्रांपैकी बाधित क्षेत्राच्या 5 कि.मी. परिघातील 1108 गावातील 16.45 लाख जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून लसीकरण मोहीम सुरु आहे. त्यानंतर प्राधान्याने गोशाळा व मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्त संख्येने पशुधन असलेल्या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे.
मंगळवार दि. 20 सप्टेंबर रोजी 25 लाख लसमात्रा प्राप्त होणार आहेत. बाधित जिल्ह्यातील जळगांव 94, अहमदनगर 30, धुळे 9, अकोला 46, पुणे 22, लातूर 3, औरंगाबाद 5, सातारा 12, बुलडाणा 13, अमरावती 17, कोल्हापूर 9, सांगली 2, वाशिम १, जालना १, ठाणे 3,नागपूर 3 व रायगड 1 अशा 271 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.
मुंबईत लम्पी रोगाचे नियंत्रण, प्रतिबंध व निर्मूलन करण्यासाठी प्राणी प्रदर्शने, बाजार, यात्रा व जनावरांची ने – आण करण्यास पूर्णतः बंदी घोषित
राज्यासह देशात अनेक ठिकाणी लम्पी आजार जनावरांमध्ये वेगाने फैलावत असल्याने मुंबईतही सावधगिरी बाळगली जात आहे. मुंबईत बैलगाड्या, घोडागाडी तसेच अनेक ठिकाणी गायीदेखील पाळल्या जातात. हे लक्षात घेता मुंबईत लम्पीचा फैलाव टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रदर्शन, जत्रा तसेच गर्दीच्या ठिकाणी प्राण्यांची ने – आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. निर्देशांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार, असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी जनावरांचे गोठे आहेत. मंदिरांबाहेर गायी बांधल्या जातात. मिरवणुकांमध्ये बैलगाड्यांचा वापर केला जातो. त्यामुळे गर्दीच्या तसेच सार्वजनिक ठिकाणी जनावरांना नेण्यास या आदेशाद्वारे मनाई करण्यात आली आहे. सर्व पोलीस ठाण्यांमध्ये या सूचना प्रसिद्ध करण्याबाबत सांगण्यात आले असून परिसरात जनावरे पाळणाऱ्यांपर्यंत संदेशही दिले जात आहेत. 13 ऑक्टोबरपर्यंत पशुपालकांनी या नियमांचे पालन करावे, असे या आदेशात नमूद आहे. तसेच लम्पी करीता मुंबई हे ‘नियंत्रित क्षेत्र’ घोषित करण्यात आले असून मुंबईत प्राणी आणण्यास सक्त मनाई आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही मुंबई पोलीसांनी दिला आहे.
समन्वय कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२२-२२८४५१३२
सिंह म्हणाले, लम्पी नियंत्रणासाठी लसीकरण करणे, बाधित पशुधनास औषधोपचार करणे, पशुपालकांना आवश्यक ते मार्गदर्शन करणे इत्यादी कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे. तथापि, काही ठिकाणी पशुपालकांना येणाऱ्या समस्या, अडचणींचे निराकरण करुन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, तसेच शेतकरी, पशुपालकांना संपर्क साधता यावा, आणि क्षेत्रीय कार्यालयाशी समन्वय साधता यावा यासाठी मंत्रालयामध्ये रुम नं. 520, 5 वा मजला (विस्तार) येथे समन्वय कक्ष सुरु करण्यात आला आहे. पशुपालक समन्वय कक्षातील ०२२-२२८४५१३२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतील.
लम्पी वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी तो त्वरित उपचार सुरु केल्यास निश्चित बरा होतो. या रोगाने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे घाबरुन न जाता मदतीसाठी पशुसंवर्धन विभागाच्या टोल फ्री क्र.१८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन सिंह यांनी केले आहे.