– आमदार डॉ. होळी यांच्या मार्गदर्शनात भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना पाठविले अभिनंदन ठराव पत्र
The गडविश्व
गडचिरोली, ७ जुलै : भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टी च्या नेतृत्वात देशाच्या सर्वोच्च असणाऱ्या राष्ट्रपती पदासाठी आदिवासी समाजातील सर्वसामान्य परिवारातील असणाऱ्या श्रीमती द्रोपदी मुर्मु यांची निवड केल्याने गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामसभांच्या वतीने भाजपाचे अभिनंदन करण्यात येत आहे. अभिनंदनाचा ठराव व पत्र आमदार डॉ. देवराव होळी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना पाठविण्यात आला आहे.
यावेळी जिल्ह्यातील ग्रामसभांचे मार्गदर्शक जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, रायपूर ग्रामसभेचे अध्यक्ष सुभाष वडधा, सचिव प्रकाश नरोटे, गोटूल सेनेचे परमेश्वर गावडे, तुळशीराम नैताम यांनी अभिनंदनाचे पत्र दिले.देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना या ७५ वर्षाच्या काळामध्ये एकदाही आदिवासी समाजाच्या व्यक्तीला देशाच्या या सर्वोच्च पदावर बसता आले नाही. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने एका सर्वसामान्य आदिवासी परिवारातील असणाऱ्या श्रीमती द्रौपदी मूर्मु यांची राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी निवड करून आदिवासी समाजाला न्याय दिला आहे. यामुळे आदिवासी समाजाची मान उंचावली असून जगामध्ये आदिवासी समाजाचा गौरव वाढविला आहे. यासाठी संपूर्ण आदिवासी समाज भारतीय जनता पार्टीच्या या निर्णयाचे समर्थन करीत असून या निर्णयाबद्दल त्यांचे अभिनंदन करीत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामसभांनी भारतीय जनता पार्टीच्या या निर्णयाचे स्वागत केले असून आपल्या ग्रामसभांच्या मार्फतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन करणारा ठराव पारित केला व तो ठराव पत्राच्या माध्यमातून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना पाठविला आहे.