रक्तपेढीतील रक्त पैसेवाल्यांनाच, गरीबांना नाही का ?

377

आंतरराष्ट्रीय रक्तदाता दिवस विशेष

रक्तदान केल्याने आपल्या शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. जे लोक ऐच्छिक रक्तदान करून जीवनदान करतात, त्यांचे आभार मानणे व नवीन लोकांना रक्तदानास प्रवृत्त करणे, असे जागतिक रक्तदाता दिवसाचे प्रमुख उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. दरवर्षी १४ जून रोजी संपूर्ण जगातील रक्तदात्यांचा सन्मान दिवस म्हणून जागतिक स्तरावर साजरा केला जातो. रक्त संक्रमणासाठी सुरक्षित रक्त व रक्त उत्पादनांची आवश्यकता, राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेत स्वयंसेवी आणि विनाअनुदानित रक्तदात्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाविषयी जागतिक जागरूकता वाढविणे, हाही यामागील हेतू आहे. हा दिवस सरकार आणि राष्ट्रीय आरोग्य अधिकाऱ्यांना आवश्यक संसाधने उपलब्ध करुन देण्यासाठी, स्वेच्छा, मोबदला न मिळालेल्या रक्तदात्यांकडून रक्त संग्रह वाढविण्यासाठी तसेच यंत्रणा व पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी कृती करण्याची संधी प्रदान करतो.
शास्त्राप्रमाणे जीवनदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. सामान्य व्यक्तीही रक्तदान करून दुसर्‍याचा जीव वाचवू शकते. आज संपूर्ण जगभरात जागतिक रक्तदाता दिन साजरा होत आहे. रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी सन २००४पासून जागतिक आरोग्य संघटना १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिवस साजरा करत असते. आजदेखील समाजात रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे रक्तदात्याला रक्तदानास प्रेरित करण्याच्या अनुषंगाने व नियमित रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी २००४पासून जागतिक आरोग्य संघटना हा दिवस साजरा करत असते. ए-बी-ओ या रक्तगटांचा शोध लावणारे आणि रक्तदान संकल्पनेला अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणारे ऑस्ट्रियाचे शरीरविज्ञानात नोबेल पारितोषिक प्राप्त डॉ.कार्ल लॅन्डस्टेनर यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस जागतिकस्तरावर साजरा केला जातो. डॉ.कार्ल लॅन्डस्टेनर यांचा जन्म दि.१४ जून १८६८ रोजी ऑस्ट्रियात झाला. त्यांचीच आज जयंती जागतिक रक्तदाता दिन म्हणून पाळण्यात येत आहे. हा दिवस सर्वप्रथम सुरू करण्याकरीता दि.१४ जून २००४ रोजी जागतिक आरोग्य संघटना, रेडक्रॉस आणि आंतरराष्ट्रीय रेड क्रॉसेंट सोसायटी ऑफ इंटरनेशनल फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रयत्न करण्यात आले होते. स्वेच्छेने व मोबदला न घेता सुरक्षित रक्तदान करण्याच्या गरजेबद्दल जनजागृती व्हावी, या उद्देशाने साजरा करण्यात आला. मे २००५मध्ये डब्ल्यूएचओने एका जागतिक आरोग्य असेंब्लीच्या जागतिक रक्तदाता दिनानिमित्त १९२ सदस्य देशांसह अधिकृतपणे समितीची स्थापना केली. जेणेकरुन जगातील सर्व देशांना रक्तदात्यांच्या बहुमोल कृतीबद्दल आभार मानण्यास आणि लोकांचे जीवन वाचवण्यास प्रवृत्त केले जाईल. हा दिवस साजरा करण्याची उद्दिष्टे लोकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करणे आणि त्याच्याशी संबंधित गैरसमज दूर करणे आहे.
अपघातात झालेला अतिरिक्त रक्तस्राव, पॅलेसोमिया, रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, प्रसूतिपश्चात रक्तस्राव, शस्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांमधे योग्यवेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशावेळी एका मानवाचेच रक्त दुसऱ्या मानवाचे प्राण वाचवू शकते. कारण मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही व दुसऱ्या कोणत्याही प्राण्याचे रक्त मानवासाठी उपयोगात येऊ शकत नाही. त्यामुळे रक्तदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्र राज्यात रुग्णांसाठी दरवर्षी सुमारे साडेसात लाख बाटल्या रक्त लागते. ही गरज ७० ते ७५ टक्के पर्यायी बदली रक्तदाता किंवा व्यावसायिक रक्तदात्याकडून भागविली जाते. मानवाच्या शरीरामध्ये साडेचार ते पाच लिटर रक्त असते. रक्तदानाच्या वेळी केवळ ३०० मिली रक्त काढले जाते. प्रत्येक रक्तदानानंतर साधारण ३६ तासांमध्ये शरीरात रक्ताची पातळी पूर्ववत होते. तसेच साधारण २ ते ३ आठवड्यांत रक्तपेशीही पूर्ववत होतात. रक्तदान केल्याने कोणताही त्रास किंवा इजा होत नाही. ब्लड बँकेच्या रेफ्रिजरेटरमध्ये फक्त ४-५ आठवड्यांपर्यंत रक्त सुरक्षित ठेवता येते. रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे रुग्णाचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचविण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते. आपल्या भारत देशात १२० कोटी लोकसंख्या असूनही केवळ ७४ लाख ते १ कोटी २० लाख लिटर रक्त संकलित होते. रक्त न मिळण्यामुळे मृत्यूचे प्रमाण देशभरात १५ ते २० टक्के आहे. भारतात केवळ ०.६ टक्के लोक रक्तदान करतात.
रक्तदान हे एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने अंगातून रक्त काढून देण्याची क्रिया आहे. असे रक्त रुग्णाच्या शरीरात चढवण्यापूर्वी बायोफार्मास्युटिकल प्रक्रियेद्वारे त्याचे विभाजन केले जाते व संपूर्ण रक्त किंवा रक्ताचा आवश्यक तोच घटक त्याच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. रक्त संकलन प्रक्रियेत ब्लड बँक- रक्त बँकांचा सहभाग असतो. बहुतेक रक्तदाते- स्वयंसेवक स्वखुशीने अणि विनामोबदला रक्तदान करतात. काही देशांमध्ये रक्ताचा पुरवठा मर्यादित आहे. कारण देणगीदार फक्त नातेवाईकांसाठी किंवा मित्रांसाठीच रक्त दान करतात. अनेक रक्तदाते रक्तदान एक देणगी म्हणून करतात. परंतु ज्या देशांमध्ये रक्त विकण्याची परवानगी आहे, तिथे रक्तदात्यांना पैसे मिळतात. रक्तदानासाठी काही ठिकाणी कामकाजावरून मोकळा वेळ दिला जातो.
वयाच्या १८ वर्षानंतर ते ६५ वर्षापर्यंत, वजन ४५ किग्रॅच्या वर असल्यास, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमीत कमी १२.५ ग्रॅम असल्यास, रक्तदाता पूर्णपणे निरोगी असल्यास, अशा निरोगी माणसाला दर ३ महिन्यांनी जवळच्या रक्तपेढीत किंवा कोठेही आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करता येते. तर रक्तदात्याने आधीच्या ३ दिवसांत कोणतेही प्रतिजैविक औषध घेतलेले असल्यास, रक्तदात्याला मागील ३ महिन्यात मलेरिया झाला असल्यास, रक्तदात्याला मागील १ वर्षात विषमज्वर, कावीळ किंवा श्वानदंश होऊन त्याने रेबीजची लस घेतली असल्यास, त्याची ६ महिन्यापूर्वी मोठी शस्त्रक्रिया झाली असल्यास, गर्भवती महिला, महिलेला १ वर्षाखालील मूल असल्यास किंवा तिचा ६ महिन्यात गर्भपात झाला असल्यास अशांना रक्तदान करता येत नाही. ब्लड प्रेशर लो किवा हाय असणाऱ्यांनी रक्तदान करताना रक्तदाबाची चाचणी करून पहावी, उपाशी पोटी किवा खाऊन झाल्यावर अर्ध्या तासापर्यंत रक्तदान करू नये. तसेच रक्तदानास इच्छुक असणारास इतरही आजारांची चाचणी करून घ्यावी लागते.
सद्या तर आपल्या देशात वर्षभरच रक्तदान शिबीरे आयोजित करून भरपूर रक्तसंकलन केले जात आहे. सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक, सेवाभावी संस्था रक्तदान शिबीरांच्या माध्यमातून संकलीत रक्तसाठा रक्तपेढ्यांकडे सुपूर्द करीत असतात. गरजूंना रक्त वेळेत मिळत नाही. प्रसंगी आर्थिक टंचाईच्या कारणाने गरीबांना प्राणानिशी मुकावे लागत आहे. मग एवढा संकलीत रक्तसाठा जातो तरी कुठे? रक्ताचा काळा बाजार होत नाही ना? हा संशोधनाचा विषय होऊन बसला आहे. नेहमीच आरोग्य विभागाची बोंब ऐकू येते, की रक्तपेढीत रक्तच उपलब्ध नाही. याकडे आज निक्षून लक्ष घालण्याची गरज असल्याची ओरड गरीब व सर्वसामान्य जनतेतून होणे साहजिकच आहे.

!! गडविश्व न्यूज नेटवर्क परिवारातर्फे समस्त रक्तदात्यांना विश्व रक्तदाता दिनाच्या प्रेरणादायी हार्दिक शुभेच्छा !!

श्री. कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी- अलककार.
(समाज सुधारणावादी विचारांचे कवी व लेखक.)
गडचिरोली, मोबा. ७७७५०४१०८६.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here