मोराची शिकार केल्याप्रकरणी पाच जणांच्या मुसक्या आवळण्यात वनविभागास यश

1428

– आरोपींना ९ मार्च पर्यंत वनकोठडी
– आरोपींकडून लोखंडी स्प्रिंग, सापळा, शिकारिकरिता वापरण्यात येणारे साहित्य जप्त

The गडविश्व
गोंदिया : जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र नवेगाव बांध अंतर्गत येत असलेल्या बोरटेकडी सहवनक्षेत्रात मोराची शिकार केल्याची घटना ६ मार्च रोजी उघडकीस आली. याप्रकरणी ७ मार्च रोजी सकाळच्या सुमारास ५ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात वनविभागाला यश आले आहे.
चिंतामण सुकलू भोगारे (६५), मेहतलाल चिंतामण भोगारे (२५) , दौलत हिरामण सलामे (४५), इंदल काशीराम सलामे(४७) सर्व रा.येरंडी दर्रे व संकेश्वर लहू मडावी (४०) रा. परसटोला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपींना न्यायालयाने ९ मार्च पर्यंत वनकोठडी सुनावली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सुरतोलीचे बीट वनरक्षक धनस्कर हे काल जंगलात गस्त घालत असतांना तीन व्यक्ती संशयास्पद वावरतांना आढळले. दरम्यान त्यांची चौकशी केली असता त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीत गळा कापलेला मोर मृतावस्थेत आढळून आला. तसेच सोबतच वाघ बिबट च्या शिकारी करीता वापरण्यात येणारे एक स्प्रिंग आढळून आले. व वन परिक्षेत्र कार्यालय नवेगावबांध येथे मोराच्या शिकारीप्रकरणी सुरतोली बिटवनरक्षक धनस्कर यांनी फिर्यात नोंद केली व पंचासमक्ष पंचनामा करून आरोपीना पुढील चौकशी साठी ताब्यात घेतले. यावेळी लोखंडी स्प्रिंग व सापळा येरंडी दर्रे येथील दौलत सलामे यांच्याकडून आणण्यात आल्याचे सांगितले तसेच इतियाडोह धरणाच्या बुडीत क्षेत्रात असलेल्या एका नाल्यात मोराची शिकार केल्याचे कबूल केले. यावेळी आरोपींकडून मृतावस्थेत असलेला मोर, शिकरीकरिता वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले. व पाचही आरोपींविरुद्ध वन्यजीवसंरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करूनअर्जुनी मोरगाव येथील प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल करून पुढील चौकाशिकरिता १० मार्च पर्यंत वन कोठडी मागण्यात आली होती. न्यायालयाने मागणी मान्य करत ९ मार्च पर्यंत सर्व आरोपींना वन कोठडी सुनावली.
प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक तथा प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी नवेगावबांध दादा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली, नवेगावबांध वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्राधिकारी रोशन दोनोडे या प्रकरणाची पुढील चौकशी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here