मानसिक आजारातून ‘प्रकाश’ झाला मुक्त

219

-‘सर्च’ मधील उपचाराचे कथन केले अनुभव

The गडविश्व
गडचिरोली : योग्य समुपदेशन आणि औषोधोपचाराने मानसिक आजार बरे होतात. ‘सर्च’ मध्ये मानसिक आजार असलेले अनेक रुग्ण बरे झाले आहेत. त्यापैकीच एक गडचिरोली येथील रहिवाशी असलेला प्रकाश. ‘सर्च’ मध्ये उपचार घेतल्यानंतरचा त्याचा अनुभव त्याच्याच शब्दात मांडला आहे.
लहानपणी शाळेत असताना माझी एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळख होती. आयआयटी मध्ये शिक्षण घेण्याचं माझं स्वप्न होत पण ते पुर्ण होऊ शकलं नाही. मग गडचिरोली येथे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले . त्यानंतर BBA ला प्रवेश घेतला. परंतु अचानक तब्बेत बिघडल्याने पूर्ण शैक्षणिक वर्ष वाया गेले, आणि तेव्हापासूनच मानसिक त्रास होण्यास सुरुवात झाली. मला झोप येत नसे , सतत काहीतरी विचार यायचे , कोणीतरी आपल्या विरोधात कारस्थान करत आहे असं वाटायचं, कधीकधी आत्महत्या करण्याचे विचारदेखील यायचे. उपचार सुरु केले , परंतु उपचार सुरु असताना देखील BBA च्या शेवटच्या वर्षाला असताना पुन्हा तब्बेत बिघडली.
पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी एमपीएससी करण्याचे ठरवले . त्यासाठी पुण्यात क्लासेस सुरु केले आणि तिथेच एका हॉस्पिटलमधे उपचार सुरु ठेवले. परंतु एमपीएससी चा अभ्यास करत असताना उपचाराकडे दुर्लक्ष झाले आणि त्यानंतर पुन्हा त्रास वाढू लागला. त्यानंतर मग घरी आलो. घरच्यांनी ‘सर्च ‘मध्ये उपचार सुरु करण्याचे ठरवले. सुरुवातीला मी ‘सर्च ‘मध्ये येण्याचं टाळत होतो पण घरच्यांच्या आग्रहामुळे येण्यास तयार झालो. ‘सर्च’ हॉस्पिटल मध्ये आल्यानंतर डॉ .आरती बंग यांच्याशी भेट झाली. तपासणी करुन त्यांनी औषधे लिहून दिली . काही महिन्यानंतर माझ्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत गेली. मी स्वतः हॉस्पिटल मध्ये येऊ लागलो. पूर्वी ज्या दवाखान्यात उपचार सुरु होते तिथे फक्त औषोधोपचार लिहून दिले जात. डॉक्टर वेळ देत नसत आणि दरवेळी डॉक्टर बदलत असे . त्यामुळे जास्त काही सुधारणा होत नसे. परंतु ‘सर्च’ मध्ये आल्यावर येथील डॉक्टरांनी वेळ देऊन योग्य औषोधोपचार आणि समुपदेशन केले ज्यामुळे मी बरा झालो. आज मी एका बँकेत चांगल्या पदावर नोकरी करत आहे आणि मुक्त विद्यापीठ मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत आहे. हे सर्व फक्त ‘सर्च’ मध्ये उपचार घेतल्यामुळे शक्य झालं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here