बालकांचे हक्क व संरक्षण अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करा : सीईओ कुमार आशीर्वाद

127

– सक्षम- बालहक्क व संरक्षण जिल्हास्तरीय कार्यशाळा
The गडविश्व
गडचिरोली, २४ सप्टेंबर : बालकांना भयरहीत व सुरक्षित वातावरण मिळावे तसेच बालकांवर होणारे लैंगिक अत्याचार यावर प्रतिबंध घालण्याचे दृष्टिने बालहक्क व संरक्षण अधिनियम, बालमजूर, बालविवाह तसेच कर्तव्याच्या ठिकाणी महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार या सर्व बाबीची जनजागृती करुन सदर संपूर्ण अधिनियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे दृष्टीने समग्र शिक्षा, महिला बाल व कल्याण विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली, जिल्हा बाल संरक्षण कक्ष जिल्हा महिला व बाल विकास विभाग, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने तसेच मिरॅकल फाऊंडेशन, पुणे यांचे सहकार्याने तालुकास्तरीय संपूर्ण नियंत्रण अधिकारी तसेच संलग्न इतर यंत्रणेत काम करणारे प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांची एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हा नियोजन सभागृह, गडचिरोली येथे सौ. माधवी खोडे, अतिरिक्त विभागीय आयुक्त नागपूर विभाग, नागपूर यांचे आभासी पध्दतीने अध्यक्षस्थानी पार पडली. सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले. प्रास्ताविकामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आजस्थितीत बालकांवर होणारे लैंगिक अत्याचार, बालमजूरी तसेच बालकांची होणारी शैक्षणिक गळती व कर्तव्याच्या ठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार या संबंधी जनजागृती होऊन यावर प्रतिबंध घालण्यास शासनस्तरावरुन विविध अधिनियम निर्गमित केलेले असून त्या सर्वांची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिने सदर कार्यशाळा आयोजित केलेली आहे. कार्यशाळेत उपस्थित संपूर्ण अधिकाऱ्यांनी तज्ञ मार्गदर्शकाकडून योग्यरितीने ज्ञान प्राप्त करुन मास्टर ट्रेनर म्हणून तालुकास्तरावर संपूर्ण यंत्रणेला अधिनियमाची जाणीव करुन देण्याकरीता प्रशिक्षणाचे आयोजन करावे असे निर्देशित केले. सदर कार्यशाळा ही वरिल संपूर्ण जनजागृतीची सुरुवात करण्याचे पहिले पाऊल असून यापूढे बालकांवरील होणारे लैंगिक अत्याचार व कर्तव्यावर असतांना महिलांवर होणारे अत्याचार यासंबधाने तालुकास्तरावर शाळेमध्ये मुलांना महिन्यातून एकदा व्यावहारिक ज्ञान व बालकांचे हक्क व संरक्षण याबाबत जनजागृती होण्यास व्याख्यान आयोजित करावयाचे आहे. तसेच तालुकास्तरावरील संपूर्ण कार्यालयामध्ये नियंत्रण अधिकारी यांच्या भेटीदरम्यान जनजागृती करावयाचे आहे. त्यामुळे सर्वांनी सदर कार्यशाळेत तज्ञ मार्गदर्शकाद्वारे देण्यात येणाऱ्या सुचनांची गांभीर्याने दखल घेऊन अधिनियमांची प्रभावी अंमलबजावणी करावे असे त्यांनी प्रतिपादन केले.

अध्यक्षस्थानावरुन बोलतांना अतिरिक्त विभागीय आयुक्त यांनी आदिवासी विकास विभागामध्ये अप्पर आयुक्त म्हणून कार्यरत असतांना गडचिरोली जिल्ह्यांतर्गत संपूर्ण आश्रमशाळांमध्ये बालकावरील होणारे लैंगिक अत्याचार, बालकांचे हक्क व संरक्षण याबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली. तसेच गुडटच व बॅडटच उपक्रम राबवून बालकांना लैंगिक अत्याचाराचे प्रतिबंध करण्यासंबधाने जाणीव करुन देण्यात आली. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी घरी गेल्यानंतर गावातील इतर बालकांना त्याबाबतची जाणीव करुन दिली. सर्व प्रशिक्षणार्थी यांनी कार्यशाळेला गांभीर्याने घेऊन प्रत्येकाद्वारे स्वतःचे मुलांची घेण्यात येणारी काळजी व त्याला स्वत:चे संरक्षण कसे करावे याबाबत जशी शिकवण दिल्या जाते तशीच शिकवण प्रत्येकाने तालुक्यांतर्गत शाळांतील विद्यार्थ्यांना तसेच परिसरातील बालकांना द्यावे जेणेकरुन बालकांचे हक्क व संरक्षण अबाधित राहील. जेव्हा समाज सुरक्षित राहील तेव्हा आपण सुरक्षित राहणार. आदिवासी विभागाची अप्पर आयुक्त म्हणून कार्यरत असतांना गडचिरोली जिल्ह्यात राबविलेले उपक्रमास समोर नेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून जिल्ह्यातील कुमार व कुमारिका यांना जणू एक आशिर्वाद देत असल्याची भावना माधवी खोडे, विभागीय आयुक्त यांनी व्यक्त केली व यापुढे गडचिरोली जिल्ह्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा संबधाने विभागीय कार्यालयाकडून प्राधान्यक्रमाने विचार करण्यात येईल व गडचिरोली जिल्ह्याला झुकते माप देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.

सदर कार्यशाळेत बालकांचा जगण्याचा, सहभागीतेचा, सुरक्षेचा, विकासाचा, समतेचा अधिकार या पाच बाल अधिकाराबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. बालहक्क अधिनियमांबाबत डॉ.संदिप लांजेवार सदस्य बालकल्याण समिती गडचिरोली, बालमजूर संबधाने गजानन गोबाडे, जिल्हाबालसंरक्षण अधिकारी, गोंदिया, बालविवाह संबधाने उमेश मोरे समन्वयक, मिरॅकल फाऊंडेशन पुणे, बालकांची शैक्षणिक गळती व शैक्षणिक हानी याबाबत दिनानाथ वाघमारे संयोजक संघर्ष वाहीणी नागपूर, बालकांवरील लैंगिक अत्याचार व बालकांचे मानसिक स्वास्थ्यावर होणारे परिणाम याबाबत डॉ. सविता सादमवार, सदस्य बाल न्याय मंडळ गडचिरोली, कर्तव्याच्या ठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार याबाबत डॉ. शुभदा देशमुख, आम्ही आमच्या आरोग्यासाठी गडचिरोली, बालकांचे हक्क व अधिकाराबाबत वर्षा मनवर, अध्यक्ष बालकल्याण समिती. तसेच कार्यशाळेचे उद्देश व निष्पत्ती याबाबत प्रिती डोईफोडे, प्रकल्प व्यवस्थापक, मिरॅकल फाउंडेशन पुणे यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून शेखर शेलार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन), ,जि.प. गडचिरोली, अर्चना इंगोले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण), जि.प. गडचिरोली, हेमलता परसा, शिक्षणाधिकारी (प्राथमिक),राजकुमार निकम, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प. गडचिरोली, विवेक नाकाडे, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. गडचिरोली उपस्थित होते. तसेच प्रशिक्षणार्थी म्हणून तालुक्यातील सर्व गटविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, केंद्रप्रमुख हे उपस्थितहोते. सदर कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्यास समग्र शिक्षा, जि.प. गडचिरोली अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उत्तम सहकार्य केले. कार्यशाळेचे संचालन अमरसिंग गेडाम, विस्तार अधिकारी (शिक्षण) व निकिता सरोदे, जिल्हा समन्वयक, व आभार प्रदर्शन अर्चना इंगोले,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण), जि.प. गडचिरोली यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here