प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर, ठिकठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ जप्त

280

-जागतिक तंबाखू विरोधी दिनी जनजागृती

The गडविश्व
गडचिरोली : जागतिक तंबाखू विरोधी दिवसाच्या निमित्ताने खर्राला नाही म्हणा, खर्रामुक्तीची शपथ घ्या असे आवाहन मुक्तीपथ व एनटीपीसी व्दारा करण्यात आले होते. त्याअनुषंगाने जिल्हा मुख्यालयासह विविध तालुक्यातील पानठेले बंद ठेवण्यात आले होते. प्रशासनाने गडचिरोली, सिरोंचा, चामोर्शी, मुलचेरा, धानोरा व कोरची येथे कारवाई करित तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले व पुन्हा विक्री न करण्याचे आवाहन केले.
धानोरा शहरात पोलीस विभाग व मुक्तीपथच्या संयुक्त विद्यमाने 23 पानठेले व दुकानांची तपासणी करण्यात आली. यावेळी तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर कोटपा कायदयानुसार एकुण 10 हजार 500 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही मोहीम उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार टेंभूर्णे, रतनपुरे, कोरे, मुक्तीपथचे तालुका संघटक अक्षय पेद्दीवार, प्रेरक भास्कर कळयामी यांनी केली. चामोर्शी शहरात पोलीस विभागाने दिलेल्या सुचनेनुसार संपुर्ण पानठेले बंद ठेवण्यात आले होते. तहसिलदार राजतिलक यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक विपीन शेवाळे यांच्या नेतृत्वात शहरातील 10 दुकानांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत पोलीस हवालदार बंडु बारसागडे, तहसिल कार्यालयाचे उमेश मडावी, विनोद शेडमाके, मुक्तीपथचे तालुका संघटक आनंद इंगळे, उपसंघटक आनंद सिडाम सहभागी झाले होते. दरम्यान कार्यक्रमाचे आयोजन करून दंत चिकित्सक डॉ. रूपाली ओल्लालवार, एनसिडी चे समुपदेशन राजेंद्र अल्लीवार, होप फाउंडेशनचे नागेश मादेशी, विषय तज्ञ शारदा कोल्हटकर यांनी तंबाखुचे दुष्परिणाम, आरोग्यावर होणारे परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. मुलचेरा शहरात पोलीस विभाग व मुक्तीपथच्या संयुक्त विद्यमाने 23 दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 14 दुकानांमध्ये मिळालेला माल जप्त करूण दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच पुन्हा तंबाखुजन्य पदार्थांची विक्री न करण्याचे आवाहन करण्यात आले. ही कारवाई A.P.I. अशोक भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली P.S.I. गणेश कड यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अमलदार चरणदास गाईन, मनीषा नालमवार, अमरदिप भुरसे, संतोष दहेलकर, मुक्तीपथ तालुका संघटक रुपेश अंबादे यांनी केली. सिरोंचा शहरात महसुल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस व मुक्तीपथच्या संयुक्त विद्यमाने शहरातील पानठेले व दुकानांची तपासणी करण्यात आली. यावेळी तंबाखुजन्य पदार्थ व खर्रा मशीन जप्त करीत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या मोहिमेत तहसिल कार्यालयातील जावेद पठाण, पोलीस स्टेशनचे महेश, अनिल नानबोलवार, आरोग्य विभागाचे उईके, निर्मला जक्कावार व मुक्तीपथ चमु सहभागी झाले होते.
कोरची शहरातील किराणा दुकान, पानठेल्यांची नगरपंचायत, पोलीस विभाग व मुक्तीपथने संयुक्तरित्या तपासणी केली. यावेळी जवळपास 10 हजार रूपयांचा तंबाखुजन्य पदार्थ जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच सर्व तंबाखुजन्य पदार्थांची मुख्य चौकात होळी करून तंबाखु मुक्तीचा संकल्प घेण्यात आला. यावेळी नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी बाबासो हाक्के यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी विजय देठे, नरेंद्र कोतकोंडावार, रवि मडावी, पोलीस उपनिरीक्षक रवि मनोहर यांच्या नेतृत्वातील देवराव पटेल, अतुल भैसारे, उईके, मुक्तीपथचे तालुका संघटक निला कन्नाके व चेतन कराडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here