प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पिक पाहणी नोंद सक्तीची नाही

500

– प्रधानमंत्री पिक विमा योजनेत ३१ जुलै पर्यंत सहभागी व्हावे
The गडविश्व
गडचिरोली, १८ जुलै : पिक विमा योजनेत भाग घेत असताना काही वेळेस पिकाचा विमा काढलेले पीक व प्रत्यक्ष शेतात असलेले पीक व प्रत्यक्ष शेतात असलेले पिक यामध्ये तफावत आढळते अशा परिस्थितीत शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहतो. शेतकऱ्यांनी शेतात घेतलेले पिक व विमा हप्ता भरतांना नोंदवलेली पिक यामध्ये काही तफावत आढळल्यास सदर शेतकऱ्यांनी पीक पाहणीमध्ये केलेली नोंद ही अंतिम गृहीत धरण्यात येईल, असा निर्णय शासनाने घेतला आहे, त्यामुळे पिक विमा योजनेत सहभाग घेतांना ई-पिक पहाणी मध्ये पिकांची नोंद असलेला दाखला असण्याची आवश्यकता नाही. सदर शेतकरी पिक विमाबाबत स्वयंघोषणा पत्राद्वारे पिक विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो मात्र १ ऑगस्ट २०२२ नंतर त्यांनी ई-पिक पाहणी मध्ये आपल्या पिकाची नोंद करावी असे आवाहन करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला असून, या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२२ पर्यंत योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतो. सद्या उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पेरणी क्षेत्राकरीता पिक विमा योजनेतून नुकसान भरपाईचा लाभ घेता येण्यासाठी शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभागी व्हावे. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामातील पिकांसाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आलेला आहे. सर्व पिकांसाठी जोखीमस्तर ७० टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.
या वर्षाची योजना कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक नसुन संपुर्णता ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकरी यांनी योजनेत सहभागी न होण्याची व विमा हप्ता कर्ज रकमेतुन वजावट करुन विमा कंपनीकडे वर्ग न करण्याची सुचना बँकेला देण्याची अंतिम मुदत नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवसाच्या आधी पर्यंत आहे. म्हणजेच २५ जुलै २०२२ हा दिनांक आहे.
अधिसुचित क्षेत्रात, अधिसुचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. गडचिरोली जिल्ह्याकरिता प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता शासनामार्फत विमा कंपनीची नेमणुक करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्याकरीता भारतीय कृषि विमा कंपनी यांच्या संपर्काकरीता पत्ता हा मुंबई क्षेत्रिय कार्यालय, स्टॉक एक्सचेंज टॉवर, २० वा मजला, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई- ४०००२३ टोल फ्री क्रं. १८०० ४१९ ५००४, ई-मेल : pikvima@aicofindia.com असा आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत सन २०२२-२३ साठी सर्वसाधारणपणे जिल्हास्तरीय पिक कर्ज दर समितीने निश्चित केलेले दराप्रमाणे विमा संरक्षित रक्कम व त्यानुसार विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के व नगदी पिकाकरीता २ टक्के विमा हप्ता हा शेतकऱ्यांना भरावयाचा आहे.
विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता भात (तांदुळ) पिकाकरीता, अधिसुचित महसुल मंडळ यात जिल्ह्यातील सर्व महसुल मंडळे असून विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर रुपये ४५०००/- याकरीता शेतकऱ्यांने सहभागी होण्याकरीता भरावयाचा विमा हप्ता प्रती हेक्टर (रुपये) ९००/-, तसेच सोयाबिन पिकाकरीता अधिसुचित महसुल मंडळे हे बामणी (ता.सिरोंचा), मुलचेरा(ता. मुलचेरा), लगाममाल (ता. मुलचेरा), विमा संरक्षित रक्कम प्रती हे. (रुपये) ४५०००/- शेतकऱ्यांने सहभागी होण्याकरिता भरावयाचा विमा हप्ता प्रती हेक्टर (रुपये) ९००/- असेल. कापूस या पिकाकरीता अधिसुचित महसुल मंडळ हे अहेरी (ता.अहेरी), आलापल्ली (ता अहेरी) , जिमलगट्टा ( ता.अहेरी), खमनचेरु ( ता.अहेरी), कमलापूर ( ता.अहेरी), बामणी (ता.सिरोंचा), सिरोंचा (ता. सिरोंचा), पेंटिपाका ( ता. सिरोंचा), असरअल्ली (ता.सिंरोंचा), चामोर्शी (ता.चामोर्शी), येनापूर(ता.चामोर्शी),
आष्टी (ता.चामोर्शी), भेंडाळा(ता.चामोर्शी) हे असतील. कापसाकरीता विमा संरक्षित रक्कम प्रती हे. (रुपये) ५००००/- असतील. शेतकऱ्यांनी सहभागी होण्याकरिता भरावयाचा विमा हप्ता प्रती हेक्टर (रुपये) २५०० रुपये असतील.
विमा संरक्षणाच्या बाबी यामधे प्रतिकुल हवामान घटकांमुळे पेरणी/लावणी/उगवण न होणे., हंगामातील प्रतिकुल परिस्थिती झालेले नुकसान. पिक पेरणीपासुन काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट , स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान, इ. आहे.
शेतकऱ्यांनी आपले फोटो असलेल्या बँक खाते पुस्तकाची प्रत तसेच आधारकार्ड छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. आधार कार्ड उपलब्ध नसल्यास आधारकार्ड नोंदणी पावतीसोबत खालीलपैकी कोणतेही एक फोटो ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. मतदान ओळखपत्र किंवा किसान क्रेडीट कार्ड किंवा नरेगा जॉबकार्ड किंवा वाहनचालक परवाना.
खरीप हंगाम २०२२ मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होणेसाठी कर्जदार शेतकऱ्यांनी आपले बँकेचे कर्जखात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी त्वरीत बँकेशी संपर्क करावा. त्याच प्रमाणे, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आधार क्रमांकाशी जोडले गेलेले बँक खाते क्रमांकच अर्जावर नमुद करावे लागणार आहे. या संदर्भात ज्या शेतकऱ्यांकडे अद्यापही आधारकार्ड नाही अश्या शेतकऱ्यांनी त्वरीत नजीकचे आधार नोंदणी केंद्राशी संपर्क करुन नोंदणीची प्रक्रिया पुर्ण करावी.
अर्ज भरण्यासाठी बँकामध्ये होणारी गर्दी टाळता यावी व शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सुलभता यावी म्हणुन खरीप हंगाम २०१७ पासुन गावपातळीवर अधिकची सुविधा उपलब्ध करण्याचे कृषि विभागाचे नियोजन केले आहे. या करिता राज्यात कार्यान्वित “आपले सरकार सेवा केंद्र ” (डिजिटल सेवा केंद्र) सुविधा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे अर्ज भरण्याकारीता उपलब्ध करण्यात आले आहे.
तरी शेतकऱ्यांनी पिक विमा संरक्षण मिळणेस्तव प्रधानमंत्री पिक विमा योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२२ या अंतिम दिनांकापुर्वी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.
योजनेतील सहभागासाठी तत्काळ नजीकच्या उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी तसेच मंडळ कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजीकच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली यांच्या तर्फे सर्व शेतकरी बंधूना करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here