प्रखर विरोधानंतरही काळोखाच्या अंधारात पातानील येथील हत्तींचे गुजरातला स्थालांतर

821

– समाजमाध्यमांवर हत्तींच्या स्थलांतराला तीव्र विरोध, विविध प्रतिक्रिया
The गडविश्व
गडचिरोली, २ सप्टेंबर : जिल्हयातील अहेरी तालुक्यातील पातानिल (patanil 3 elephants ) येथील वनविभागाच्या हत्ती कॅम्पमधील ३ पाळीव हत्तींचे गुजरातमधील जामनगरला आज २ सप्टेंबरच्या मध्यरात्री गुपचूप काळोखाच्या अंधारात एका बंदिस्त वाहनातून स्थलांतर केल्याची माहिती समोर आली आहे.
एकीकडे संपुर्ण राज्यात गणोशोत्सव साजरा करण्यात येत असतांना या दरम्यान गडचिरोली जिल्हयातील पातानील येथील हत्तीचे स्थलांतर तीव्र विरोध असतांनाही काळोखाच्या अंधारात गुपचूप केल्याने जिल्हयातील नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच काळोखाच्या अंधारात हत्तीचे स्थलांतर केल्याने नागरिकांच्या वतीने वेगवेगळया प्रतिक्रीया समाजमाध्यमांवर उमटतांना दिसत असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. हत्तींना नेतांनाचे व्हिडिओ ही समाजमाध्यमांवर वायरल होता आहेत.
गुजरातमधील जामनगरच्या भागात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून देशातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय सुरु करण्यात येत आहे. सुमारे २५० एकर जागेतील या प्राणीसंग्रहालयात देशभरातील विविध ठिकाणचे दुर्मीळ प्राणी नेण्याची प्रक्रिया या वर्षाच्या प्रारंभीच सुरु झाली आहे. केंद्र सरकारच्या वने आणि पर्यावरणमंत्रालयाच्या अखत्यारितील केंद्रीय प्राणी प्राधिकरणाने १२ फेब्रुवारी २०१९ ला रिलायन्सच्या या प्राणीसंग्रहालयास मंजुरी दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्यतील अहेरी तालुक्यातील कमलापूर आणि पातानिल येथील हत्तींना नेण्याच्या हालचाली जानेवारी २०२२ मध्ये सुरु झाल्या होत्या. प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडून तसे पत्रही येथील वनविभागाला प्राप्त झाले होते. परंतु जिल्हाभरातून हत्तींच्या स्थलांतरणाला जिल्ह्यातील अनेक संघटना तसेच नागरिकांनी विरोध दर्शविला होता त्यामुळे हत्तींना तेथेच ठेवण्यात आले.
परंतू आता चार दिवसांपूर्वी वरिष्ठ स्तरावरून आलापल्ली वन विभागाला पातानील येथील हत्ती हलविण्याबाबत पत्र मिळाले. त्यानुसार आज मध्यरात्री रिलायन्स समुहाच्या राधे क्रिष्णा एलिफंट वेल्फेअर ट्रस्टची तीन वाहने पातानिल येथे दाखल झाली. या वाहनांमधून ३ हत्तींना जामनगरच्या दिशेने रवाना केले. यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून समाजमाध्यमांवर हत्तींच्या स्थलांतरणास तीव्र विरोध केला जात आहे. तसेच ऐन गणेशोत्सव काळात रात्रोच्या काळोखात हत्तींचे स्थलांतर केल्याने नागरिकाच्या भावना दुखावल्या असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
तर आता कमलापूर हत्ती कॅम्पमधील उर्वरित ५ हत्ती देखील गुजरातच्या प्राणीसंग्रहालयात नेले जातील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या स्थलांतराविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे.

पातानील हत्ती विषयी

गडचिरोली जिल्ह्यातील व्यापारदृष्ट्या अहेरी तालुका सर्वाधिक विकसित भाग आहे. या तालुक्यातील आलापल्ली या गावापासून ४ किमी अंतरावर पातानील गणेश मंदिर आहे. आलापल्ली भागातील सागवान हे जगातील उत्तम दर्जाचे सागवान समजले जाते. १९८० च्या दशकात हे सागवान लाकूड व्यावसायिक पद्धतीने तोडणी व विक्री करण्यासाठी मुलभूत वाहक म्हणून हत्तींचा वापर केला जात होता. १९८१ साली या भागात वन विभागाच्या अखत्यारीत ४ हत्ती होते. कापलेले सागवान जंगलाबाहेर आणण्याच्या रोजच्या कामावर हत्ती नेमले असताना यातील एक हत्ती जंगलात बेपत्ता झाला. २ दिवस उलटूनही या किर्र जंगलात त्याचा काही पत्ता लागेना. शेवटी वन विभागाच्या शोध मोहिमेतील कर्मचारी व मजुरांनी बाप्पाच्या चरणी साकडे घातले. ” हत्ती सापडू दे, ११ पोती नारळ फोडू ” आणि काय आश्चर्य काही क्षणातच हरविलेल्या हत्तीची किंकाळी मजुरांच्या कानी आली. मजुरांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा लक्षात आले की हत्तीच्या गळ्यातील साखळदंड एका दगडाला अडकले आहेत. ते काही केल्या निघेनात. शेवटी जोर लावून हा दगड बाहेर काढला गेला. बघतात तर काय चक्क या दगडाला श्री गणेशाचे रुपडे होते. या पद्धतीने वन विभागावरील संकट गणरायानेच दूर केले, म्हणून वनविभागाच्या अधिकारी, कर्मचारी व मजुरांनी एकत्र येत ही मूर्ती साफ करून तिची प्राणप्रतिष्ठा केली.
हा सर्व प्रकार एखाद्या चमत्कारापेक्षा काही कमी नव्हता. आता पातानीलचा गणपती हा नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध पावला आणि ते हत्ती सुद्धा तिथेच राहू लागले. आलापल्ली येथे कोणताही सण असो आधी त्या ३ हत्तींचे दर्शन व पूजा मगच सण साजरी करतात. पातानिल येथील हत्ती कधीच गावकऱ्यांवर हिंसक झाले नाही . मात्र आता शासन त्या तीनही हत्तींना गुजरात येथील खाजगी प्राणी संग्रहालयात हलविण्यापेक्षा एक मिनी एलिफंट पार्क पातानील येथे उभारा अशी मागणीही सामाजिक संघटनेद्वारे करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here