-तालुका समितीच्या बैठकीत तहसीलदारांचे निर्देश
The गडविश्व
गडचिरोली : तालुक्यातील अवैध दारूविक्रेत्यांवर पोलिस विभागाने कारवाई करावी. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातून चामोर्शी तालुक्यात अवैध दारूची वाहतूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रमुख नाक्यावर तपासणी पथक गठीत करून अवैध दारूच्या तस्करीवर आळा घालावा, असे निर्देश तहसीलदार संजय नागटिळक यांनी दिले.
चामोर्शी तहसिल कार्यालयातील सभागृहात तंबाखु व दारूमुक्त जिल्हा विकास कार्यक्रम अंतर्गत आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मुक्तिपथ अभियानाचे उपसंचालक संतोष सावळकर, संवर्ग विकास अधिकारी यांचे प्रतिनिधी शेख, पोलिस निरीक्षक यांचे प्रतिनिधी राजेश गणवीर, मुक्तिपथ तालुका संघटक आनंद इंगळे, वन परिक्षेत्र अधिकारी पी.आर.लेले, विनोद बोबाटे, सामाजिक संस्थेचे बांबोळे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले व तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली. सदस्य व कार्यप्रणालीचे वाचन करण्यात आले. गाव पातळीवर दारू व तंबाखूमुक्तीकरिता समिती तयार करणे. नगरपंचायत निवडणूक दारूमुक्त होऊन मतदान शांततेत पार पाडण्यासाठी जनजागृती करणे. संवर्ग विकास अधिकारी यांच्या आदेशान्वये गाव संघटनेला ग्रामपंचायतद्वारा मान्यता देणे. शहर पातळीवर एक पथक गठीत करून पानठेले व किराणा दुकानधारकांना सुगंधित तंबाखूची विक्री बंद करण्याबाबत सूचना देऊन तपासणी करणे. वनविभागाद्वारे जंगल परिसरात असलेला अवैध मोहसडवा नष्ट करून कारवाई करणे. आदी विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.