नागपुरात मारबत व बडग्याची धूम !

295

तान्हापोळा व मारबत विशेष

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी लहान मुले आजही लाकडाचा किंवा मातीचा लहान नंदीबैल सजवून त्याची मिरवणूक काढतात. नंदीबैलांना रंगवणे, तोरण-फुलांनी सजवणे, त्यांना आकर्षक बनवणे ही कामे सणाच्या कितीतरी दिवस आधीपासूनच करण्यासाठी त्यांची लगबग सुरू असते. ज्या दिवशी तान्हापोळा असतो त्या दिवशी ही बच्चेकंपनी आपापले नंदीबैल घेऊन शेजारी तसेच ओळखीच्या लोकांच्या घरी जातात. तेथे पोळा मागितला जातो. मग त्या नंदीबैलाला व नंदीबैलधारकाला ते ओळखीतले कुटुंब ओवाळून खाऊ आणि पैसे देतात. तोंड गोड करतात. काही ठिकाणी या लाकडी नंदीबैलांचा भव्यदिव्य मेळावा भरतो. तसेच अनेक ठिकाणी या लहान मुलांसाठी नंदीबैलांची सजावट आणि स्पर्धा आयोजित करण्यात येतात.
भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. महाराष्ट्रात व त्यातल्या त्यात विदर्भात पोळा हा एक शेतकऱ्यांचा मोठा सण आहे. त्या दिवशी बैलांना कामकाजापासून सुट्टी असते. त्या दिवशी बैलांना न्हाऊ-माखू घालतात. त्यांना गोड पुरणपोळीचे जेवण घालतात, त्यांना सजवतात व मिरवतात. त्या दिवशी त्यांची घरोघरी पूजा होते. लहान मुले मोठे बैल नेऊ शकत नाहीत. ते त्यांना आवरू पण शकत नाहीत. म्हणून त्यांच्या हौस-मजेसाठी तान्हापोळा साजरा करण्यात येतो. त्या दिवशी लहान मुले माती किंवा लाकडापासून तयार केलेला नंदीबैल घेऊन खऱ्या बैलाप्रमाणेच या नंदीबैलांचा तान्हापोळा साजरा करतात. नागपूरकर भोसल्यांच्या शासनकाळात हा सण सुरू झाला. विदर्भात बहुधा सर्व ठिकाणी हा सण साजरा होतो. विदर्भात पोळ्याचा सण उत्साही वातावरणात व मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. येथील अनेक ठिकाणी बैलपोळा या सणाच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा सण म्हणजे तान्हापोळा होय. हा सण म्हणजे बालगोपाळांचा सण- बालोत्सव असतो. कारण लहान मुले मोठे बैल नेऊ शकत नाही किंवा व्यवस्थित सांभाळू शकत नाही. बैलांना आवरणे त्यांना कठीण जाते. तान्हापोळा हा सण साजरा करण्यामागेही इतिहास आहे-
सन १८०६ च्या काळात नागपुरात रघुजी राजे भोसले द्वितीय हे येऊ घातलेल्या पोळ्याची तयारी करत होते. शेती आणि शेतकरी हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. शेतीकडे ते एक व्यवसाय म्हणून नव्हे तर परंपरा आणि संस्कृती म्हणून पाहत होते. ही परंपरा नव्या पिढीने देखील जोपासली पाहिजे, असा त्यांचा आग्रह असायचा. यातूनच तान्हापोळा या सणाचा जन्म झाला. रघुजी राजे भोसले द्वितीय हे दूरदृष्टी असलेले लोकांचे नेते असल्यामुळे त्यांनी नवीन पिढ्यांना शेती व शेतीशी जुळलेले बैल यांच्याप्रती आस्था व रुची वाढावी, म्हणून तान्हापोळा सुरू केला.
श्रावण अमावस्येला साजरा होणाऱ्या मोठ्या बैलांच्या पोळ्यात लहान मुलांचा जास्त संबंध येत नाही. ते फक्त बघतच असतात. यातून महाराजांना एक कल्पना सुचली आणि ती त्यांनी लगेच अमलात आणली. लहान मुलांना मोठा व खराखुरा बैल सांभाळणे कठीण असते म्हणून त्यांनी लाकडाचा बैल तयार करून घेतला. या लाकडी बैलांना चाके लावली. मोठ्या बैलांचा जसा पोळा सण साजरा करतात, तसाच हा उत्सव सुरू केला. बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढली. मोठ्या पोळ्यातील सर्व गोष्टी या तान्ह्यापोळ्यात सुरू केल्यात. बैलाची पूजा झाल्यावर पोळा फुटला, अशी दवंडी दिली जायची. हा सण लहान मुलांसाठी असल्यामुळे महाराज त्या मुलांना मिठाई व इतर भेटवस्तू देत. भोसले चौफेर असले तरी तान्हापोळा नागपूरकर भोसलेच साजरा करतात. पशुप्रेमाची पूर्वापार परंपरा विद्यमान मुधोजी राजेंनी जपली. त्यांच्या संग्रहात आजही उमदे घोडे, राजहंस, विविध पक्षी व प्राणी आहेत.
नागपुरात तर पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत आणि बडग्याचा उत्सव असतो. समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारबतीला घालण्यात येते. या उत्सवात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्दे आणि स्थानिक समस्या यावर भाष्य करणारे फलक असतात. ही परंपरा सन १८८१ पासून सुरु झाली. मारबत आणि बडगा हा जगातील एकमेव असा मिरवणूक प्रकार फक्त नागपुरातच आहे. आता तर काळी मारबत व पिवळी मारबत तयार करतात आणि त्यांची मोठ्या धुमधडाक्यात मिरवणूक काढतात. विदर्भात नागपूर आणि आसपासच्या सर्व भागात तान्हापोळा साजरा केला जातो. बैलपोळा आणि तान्हापोळा असे दोन सण दोन दिवस साजरे केले जातात. शेतीची आणि पशुधनाची असलेली बांधिलकी व कृतज्ञता जपण्याचा प्रयत्न केला जातो. परंपरा आणि संस्कृती जपली जाते. म्हणूनच विदर्भातील पोळा सण वैशिष्ट्यपूर्ण आणि आगळावेगळा ठरला आहे.

!! The गडविश्व न्युज पोर्टलतर्फे तान्हापोळा निमित्ताने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

श्री एन. के. कुमार गुरूजी.
[भारतीय सण व उत्सवांचे गाढे अभ्यासक]
रामनगर- गडचिरोली, मो. ७७७५०४१०८६.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here