– विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी तहसीलदारांनी दिल्या शुभेच्छा
The गडविश्व
मुलचेरा, २९ जुलै : जवाहर नवोदय विद्यालयच्या इयत्ता ६ वीत प्रवेशासाठी शैक्षणिक सत्र २०२१-२२ या वर्षात घेण्यात आलेल्या परीक्षेत मुलचेरातील ६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. मुलचेराचे तहसीलदार कपिल हटकर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या कार्यालयात पाचारण करून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, नायब तहसीलदार सर्वेश मेश्राम, नायब तहसीलदार राजेंद्र तलांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
२७ जुलै रोजी तहसील कार्यालय मुलचेरा येथील कार्यालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात जवाहर नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा मुलचेराचे विद्यमान तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी नवोदय विद्यालयातील आपले अनुभव कथन करतानाच विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तहसीलदार कपिल हटकर यांनी आपल्या मार्गदर्शनात प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येत असतात मात्र संधीचं सोने करणे आपल्या हातात असते. तुमच्या आयुष्यातील ही खूप मोठी संधी असून त्याचे सोने करण्यासाठी खूप अभ्यास करा. स्वतःचे आणि आपल्या गडचिरोली जिल्ह्याचा नावलौकिक करा असेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले.
संपूर्ण भारतात ३० एप्रिल रोजी जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा घेण्यात आली होती. राजे धर्मराव हायस्कुल, मुलचेरा येथील केंद्रात विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या परीक्षेसाठी २६३ विद्यार्थ्यांनी आवेदन पत्र भरले होते. त्यापैकी २४८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. नुकतेच त्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात ६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्यात खाजगी शाळेतील तीन तर जिल्हा परिषद शाळेतील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी २०२२-२३ या नूतन शैक्षणिक वर्षात जवाहर नवोदय विद्यालय घोट येथे इयत्ता सहावीत प्रवेश घेतले असून २७ जुलै रोजी शाळेत रुजु झाले.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कु.काव्या महेश गुंडेटीवार हैदराबाद इंटरनॅशनल स्कुल, मुलचेरा, कु.औक्षणी पराग दुर्योधन ग्रीनलिफ पब्लिक स्कुल मुलचेरा, सुमित सुरेश दब्बा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मल्लेरा, कु.मनस्वी शामु आत्राम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लगाम, अधर्व अनिल मेकलवार जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोहूर्ली, सिद्धांत रवींद्र झाडे ग्रीनलिफ पब्लिक स्कुल, मुलचेरा या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांनी सुद्धा तहसीलदार कपिल हटकर आणि तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांचे आभार मानले. खूप अभ्यास करणार असल्याचेही ग्वाही दिली. तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या चिमुकल्यांना केलेला मार्गदर्शन त्यांच्या उज्वल भविष्यासाठी मोलाचा ठरणार हे विशेष.