– ब्रम्हपूरी येथील घटनेने खळबळ, करावी लागली प्लास्टिक सर्जरी
The गडविश्व
ब्रम्हपूरी , ३० जुलै : वाढदिवसाला केक वर लावण्यात येणारी फवारा उडवणारी कॅन्डल एक १० वर्षीय बालक हातात धरून असतांना तिचा अचानक स्फोट झाला. यात त्या बालकाचा उजवा गाल पुर्णतः फाटुन छिन्नविछिन्न झाल्याची धक्कादायक घटना गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घडली. आरंभ विनोद डोंगरे (१०) असे गंभीर जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, चिमुर तालुक्यातील भिसी येथील रहिवासी असलेले विनोद डोंगरे हे आपल्या पत्नी व १० वर्षीय मुलासह मित्राच्या घरी असलेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात गेले होते. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास वाढदिवस सुरू झाला. केकवर लावण्यात आलेली फवारे उडवणारी कॅन्डल पेटविण्यात आली. दरम्यान ती कॅन्डल विझविण्यात सुध्दा आली व केकसुध्दा कापून झाला. ही कॅन्डल केकवरून काढून बाजूला फेकण्यात आली तेव्हा विनोद डोंगरे यांचा मुलगा आरंभ याने ती कॅन्डल आपल्या हातात पकडली असता तिचा स्फोट झाला. स्फोट एवढा भिषण होता की त्यामध्ये आरंभ चा उजवा गाल पुर्णतः छिन्नविछिन्न झाला. गालातून मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाला. लागलीच उपचाराकरीता त्याला ब्रम्हपूरी येथील आस्था रूग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी त्याच्यावर रूग्णालयातील डॉक्टर व चमुने प्लास्टिक सर्जरी करून त्याचा फाटलेल्या गालाचा भाग आणि जीभ जोडण्यात आली. गालावर तब्बल १५० टाके मारण्यात आल्याचे कळते. ही शस्त्रक्रीया प्लास्टिक सर्जन डॉ श्रीकांत पेरका, डॉ. सुमित जयस्वाल, डॉ. पंकज लडके यांनी यशस्वीपणे पार पाडली.
