देसाईगंज येथील नविन बसस्थानकाच्या बांधकामास लवकरच होणार सुरुवात

154

– आमदार कृष्णा गजबे यांच्या पाठपुराव्यास यश
-परिवहन मंत्री ना.अनिल परब यांचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश

THE गडविश्व
देसाईगंज : शहरातील रखडलेल्या बहुचर्चित, बहुप्रतिक्षितीत नविन बसस्थानकाच्या बांधकामासाठी विशेष बाब म्हणुन तत्काळ निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्याचे परिवहन मंत्री ना.अनिल परब यांनी संबंधित विभागाला दिले असल्याने येथील नवीन बसस्थानकाच्या बांधकामास लवकरच सुरुवात करण्यात येणार असुन यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या पाठपुराव्यास मोठे यश आले असल्याचे यामुळे बोलल्या जाऊ लागले आहे.
प्रत्येक तालुकास्थळी बस स्थानक असावे असे शासनाचेच धोरण असले तरी देसाईगंज येथील बस स्थानकाचा प्रश्न अधांतरीच असल्याने चक्क रस्त्यावर बसेस उभ्या करुन प्रवासी वाहतूक करण्यात येत असल्याने शहराच्या मुख्य मार्गांवर वाहतूकीचा तासनतास खोळंबा होत होता. ही गंभीर बाब आमदार कृष्णा गजबे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या निदर्शनास आणून देऊन बस स्थानकाच्या जागेचा प्रश्न मार्गी लावुन सन २०१८ मध्येच नविन बसस्थानकासाठी निधी मंजूर करवून घेतला होता.
त्या अनुषंगाने बसस्थानकाच्या जागेचा ताबा घेण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली येथील विभाग नियंत्रण यांच्याकडून पारीत आदेशातील रक्कम शासन खजिना दाखल करण्याच्या प्राप्त सुचनेनुसार देसाईगंज येथील नझुल खसरा क्रमांक २४\५ मधील खुल्या खंडकापैकी क्षेञ ६१२० चौ.मी.जमिनीची अनुज्ञेय रक्कम १ कोटी २४ लाख २३ हजार रुपये ३ नोव्हेंबर २०१८ अन्वये शासन खजिन्यात जमा करण्यात आले होते.
दरम्यान गडचिरोली येथील नगर रचनाकार यांच्या पञानुसार आरक्षण क्रमांक १६ पैकी आयटीआय कार्यालयाच्या मागील बाजूस पश्चिम-उत्तर कोप-यातील सुमारे २०२५ चौ.मी.क्षेञ पेट्रोलपंप प्रयोजनार्थ वगळून राज्य परिवहन विभागास २९ नोव्हेंबर २०१८ रोजी आवश्यक क्षेञफळाचा ताबा अटी व शर्थिच्या अधिन राहुन देण्यात आला होता.
सदर कामाची निविदा प्रक्रिया पुर्ण करुन कंञाट निश्चित करण्यात आल्यानंतर तत्कालीन परिवहन मंत्र्यांच्या हस्ते बसस्थानकाच्या बांधकामाचे भूमिपूजनही उरकण्यात आले होते. परंतु निविदा प्रक्रिया पुर्ण होऊनही राज्य परिवहन मध्यवर्ती कार्यालयाकडुन कार्यारंभ आदेश वेळेत दिले गेले नसल्याने सदर बसस्थानकाचे काम सुरु होऊ शकले नाही. दरम्यान निवडणुका आचारसंहिता व कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे निधीच्या कमतरतेमुळे मंजुर असलेल्या निविदेला कार्यारंभ आदेश देण्यात आले नाही.
दरम्यान सन २०२१ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ८ मार्च २०२१ रोजी तारांकित प्रश्न क्र.२३८३५ ला आमदार गजबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना निधी अभावी बसस्थानकाचे काम सुरु न झाल्याचे मान्य करुन लवकरच निधी उपलब्ध करून बसस्थानकाचे बांधकाम पुर्ण करण्याचे आश्वासन देऊन सुद्धा आश्वासनाची पुर्तता करण्यात आली नसल्याने प्रवाशांना प्रचंड गैरसोईचा सामना करावा लागत असल्याचे मुंबई येथे नुकतेच पार पडलेल्या अधिवेशनात आमदार गजबे यांनी २७ डिसेंबर २०२१ रोजी सभागृहाच्या निदर्शनास आणून देताच परिवहन मंत्री ना.अनिल परब यांनी तत्काळ निधी उपलब्ध करून देण्या संदर्भात संबंधित विभागाच्या अधिका-यांनी निर्देश दिल्याने एकुणच येथील बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी सातत्याने प्रयत्नशिल राहुन पाठपुरावा केल्याने आमदार गजबेंच्या प्रयत्नांचे मोठे यश असल्याचे यामुळे बोलल्या जाऊ लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here