देसाईगंज तालुक्यातील हजारो शेतकरी धान चुकाऱ्याच्या प्रतीक्षेत

333

देसाईगंज तालुक्यातील १०१७ शेतकऱ्यांना ४६६५४.४० लाख पेक्षा जास्त रक्कमेच्या धान चुकाऱ्यांची प्रतिक्षा !
The गडविश्व
देसाईगंज, १५ जुलै : केंद्र शासनाच्या आधारभूत धान्य खरेदी योजने अंतर्गत पणन हंगाम हंगाम (रब्बी ) २०२१-२२ मध्ये मार्केटिंग फेडरेशनच्या वतिने देसाईगंज तालुक्यात खरेदी विक्री संस्थेच्या माध्यमातून हमी भावाने धान्य खरेदी करण्यात आली. देसाईगंज खरेदी विक्री संस्थेच्या कुरुड , किन्हाळा व कोरेगाव केंद्रावर हमी भावाने ६ जून २०२२ पासून १५ जून २०२२ पर्यंत धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे अजून पर्यंत जमा झाले नाही. तसेच पुढील दिनांकाचेही चुकारे प्रलंबित आहेत. त्यामुळे देसाईगंज तालुक्यातील १०१७ शेतकऱ्यांना ४६६५४.४० लाख पेक्षा जास्त रक्कमेच्या धान चुकाऱ्यांची प्रतिक्षा लागली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी धानाला मिळणारा हमीभाव यामुळे चालू रब्बी हंगामातील धानाची विक्री मार्केटिंग फेडरेशनच्या आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर करण्यासाठी टोकण काढून नोंदणी केली होती. प्रत्यक्ष हमीभावाने केंद्रावर धानाची खरेदी ६ जून २०२२ पासून सुरु केली.परंतु अजूनपर्यंत एकाही शेतकऱ्याचे धानाचे चुकारे जमा न झाल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. देसाईगंज तालुक्यातील १०१७ शेतकऱ्यांना ४६६५४.४० लाख पेक्षा जास्त रक्कमेच्या धान चुकाऱ्यांची प्रतिक्षा असल्याने शेतकरी आपले धानाचे चुकारे कधी जमा होणार यासाठी चातकासारखी वाट पाहत आहेत.
रब्बी पणन हंगाम २०२१-२२ चा कालावधी १५ जून २०२२ पर्यंत होता. असे असले तरी १५ जून पूर्वीच पोर्टल बंद झाल्याने धान खरेदी मध्येच थांबली. अनेक शेतकऱ्यांना टोकण काढून रब्बी हंगामातील धानाची विक्री करता आली नाही. आता पुन्हा पुढे धान खरेदीला १५ जुलै पर्यंत मुदत वाढ मिळाल्याने तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या धानाची खरेदी केंद्रावर विक्री सुरु केली आहे. परंतु असे असले तरी देसाईगंज तालुक्यातील टोकण काढलेल्या शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेता धान खरेदीसाठी दिलेली १५ जुलैची मुदत वाढ पुरेशी नसून ती ३० जुलै पर्यत करुन उद्दिष्टातही वाढ करावी अशी मागणी देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
खरीप हंगाम २०२२-२३ ला सुरवात झाली आहे. अनेकांनी धानाची रोवणी सुरु केलीआहे. रोवणीसाठी रासायनिक खत, औषधी , मजुराची मजूरी , चिखलणी यासाठी पैसाची गरज असते. परंतु अजून पर्यंत धानाचे चुकारे जमा न झाल्याने मजूरांच्या रोजीची रक्कम द्यावी कुठून ? खत , फवारणी औषधीची खरेदी कशी करावी ? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. खरीप हंगाम २१-२२ मधील धानाचे बोनसही देण्यात न आल्याने शेतकरी चांगल्याच आर्थिक अडचणीत सापडला. त्यामुळे रब्बी हंगाम २०२१-२२ मधील आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाचे चुकारे लवकरात -लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे,अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here