-विजेत्यांचा सत्कार
The गडविश्व
गडचिरोली, १ नोव्हेंबर : एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या उडेरा व करेम गावातील नागरिकांना अवैध दारूविक्रीविरोधात संघटित करण्याच्या उद्देशाने मुक्तिपथ व गाव संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ‘रन फॉर मुक्तिपथ मॅराथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून एकूण ९० स्पर्धकांनी धाव धरली. यशस्वी स्पर्धकांना गौरविण्यात आले.
अतिदुर्गम उडेरा येथील मॅरेथॉन स्पर्धेत युवक, युवती, पुरुष व महिला अशा चारही गटातील ४७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मॅरेथॉन स्पर्धेत विजेता स्पर्धकांना माजी पंस सदस्य निर्मला गावडे, गाव संघटनेच्या अध्यक्ष राजेश्वरी नक्कावार, दिपा झाडे, बी एन उराडे यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र, मेडल व शाल देऊन गौरविण्यात आले. दरम्यान स्पर्धेचे रूपांतर सभेत करून गावात विदेशी दारूविक्री बंदीचा निर्णय महिलांनी घेतला. करेम येथील स्पर्धेत ४३ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेत प्रथम, द्वितीय आलेल्या स्पर्धकांना मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले. यावेळी मुक्तीपथ गाव संघटन सदस्य वसंती तलांडे, किरण आलाम, ग्रापं सदस्य दशरथ तलांडे, जालेंद्राव आलाम यांच्यासह गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते. दोन्ही कार्यक्रमांचे नियोजन तालुका संघटक किशोर मलेवार, स्पार्क कार्यकर्ती कुमोटी यांनी केले.