– रॅलीच्या माध्यमातून विक्रेत्यांच्या घरी भेट
The गडविश्व
गडचिरोली, २२ सप्टेंबर : धानोरा तालुक्यातील चिचोली गावातील दारूविक्रीबंदी कायम टिकवून ठेवण्यासाठी गावातील महिला एकवटल्या आहेत. गाव संघटना व गावातील महिलांनी रॅली काढत दारूविक्रेत्यांच्या घरी भेट दिली. तसेच गावात दारूविक्री केल्यास कारवाई करण्याची तंबी दिली आहे.
चिचोली गावात मागील चार वर्षांपासून अवैध दारूविक्री बंद आहे. अशातच जुलै महिण्यापासून गावातील पाच विक्रेत्यांनी चोरट्या मार्गाने दारूविक्री करण्यास सुरवात केली. ही बाब लक्षात येताच गाव संघटनेने बैठक घेऊन दारूबंदी कायम ठेवण्याचा व विक्री करणाऱ्यांवर ५ हजारांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गावातील दारूविक्रेत्यांना अवैध व्यवसाय बंद करण्याचे आवाहन करण्यासाठी गावातून रॅली काढण्यात आली. या रॅलीत जवळपास ८० महिलांनी सहभाग घेतला.
दरम्यान, रॅलीच्या माध्यमातून दारूविक्रेत्यांच्या घरोघरी भेट देऊन संघटनेच्या नियमानुसार पुन्हा दारूविक्री करतांना आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे ठणकावून सांगण्यात आले. यावेळी गाव संघटनेच्या प्रतिभा शेंडे, देवांगना गावतुरे, ताराबाई निकुरे, सुगंधा वाढई, मंजुषा गावळे, शंकुतला चौधरी, ममता गुरनुले, सुवर्णा वाडगुरे, मुक्तिपथचे भाष्कर कड्यामी, स्पार्कचे राहुल महाकुळकर यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या विषयाची तक्रार संबधित पोलीस स्टेशनला देण्याचे सुद्धा यावेळी संघटनेच्या सदस्याने ठरविले आहे.