दहिहंडीच्या प्रो-गोविंदा स्पर्धांना मान्यता

397

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
The गडविश्व
मुंबई, १९ ऑगस्ट : महाराष्ट्राची  सांस्कृतिक ओळख आणि परंपरा असलेल्या दहिहंडीच्या (गोविंदा) “प्रो गोविंदा” स्पर्धा घेण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. स्पर्धेसाठी बक्षीसाची रक्कम शासनातर्फे देण्यात येईल. त्याचबरोबर खेळाडू संवर्गातून विजेत्यांना शासकीय नोकरी देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्य शासनाने दहिहंडी (गोविंदा) या उत्सवाचा क्रीडा प्रकारात समावेश करून “प्रो गोविंदा”  स्पर्धा राबवाव्यात, अशी मागणी दहीहंडी उत्सव आयोजकांकडून करण्यात येत होती. त्यानुसार राज्यात प्रो गोविंदा स्पर्धा आयोजित केल्या जातील आणि त्याच्या बक्षिसाची रक्कम शासनामार्फत दिली जाईल. त्याचबरोबर  खेळाडू संवर्गातून शासकीय नोकरी देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
स्पेन व चीन या देशांमध्ये मानवी मनोरे (पिरॅमिड) म्हणून या खेळाचा क्रीडा प्रकारात समावेश असून आपल्याकडे असलेल्या कबड्डी, खो-खो, मल्लखांब सारख्या खेळांप्रमाणे दहीहंडीचाही समावेश होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here