दलित-श्रमिक समृद्घीचा धगधगता संघर्ष !

331

अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी

उपेक्षित गुन्हेगार म्हणून कलंकित ठरवले गेलेले, दलित आणि श्रमिक यांच्या समृद्घीचे स्वप्न अण्णाभाऊ पाहात आले. महामानव डॉ.बाबासाहेबांच्या लढाऊ आणि विमोचक विचारांचे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर झालेले होते. जग बदल घालुनी घाव। सांगूनि गेले मज भीमराव॥ हे त्यांचे गीत खूप गाजले. त्यांनी लिहिलेल्या लावण्यांत माझी मैना गावावर राहिली आणि मुंबईची लावणी या अजोड आणि अविस्मरणीय आहेत. अधिक माहितीसाठी वाचा श्री एन. कृष्णकुमार यांचा हा ओजस्वी लेख..

अण्णाभाऊ ऊर्फ तुकाराम भाऊराव साठे यांची निरीक्षणशक्ती अत्यंत सूक्ष्म होती. त्यांच्या लेखन शैलीला मराठमोळा, रांगडा पण लोभस घाट आहे. नाट्यमयता हाही त्यांच्या लेखनशैलीचा एक खास गुण होता. ज्या विपर्यस्त जीवनातून अण्णाभाऊंनी अनुभव आत्मसात केले, त्यांतील क्षणांचा वेग आणि आवेग त्यांच्या लेखनात जाणवतो. लवचिक भावचित्रे अंगासरशा मोडीने साकार करण्याची त्यांची लकबही स्वतंत्र आहे. लेखनावर त्यांनी जीव जडवला होता; त्यांनी ते विपुल केले. रशियाच्या इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटीच्या निमंत्रणावरून ते सन १९६१ साली रशियाला गेले. तेथील अनुभवांवर आधारित माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन त्यांनी लिहिले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये आदींचा समावेश होता. महाराष्ट्राची परंपरा या नावाने त्यांनी या चळवळीसाठी पोवाडा लिहिला; त्याचप्रमाणे मुंबई कुणाची? या लोकनाट्याचे महाराष्ट्रभर प्रयोग केले. अकलेची गोष्ट, देशभक्त घोटाळे, शेटजींचे इलेक्शन, बेकायदेशीर, पुढारी मिळाला, लोकमंत्र्यांचा दौरा ही त्यांची अन्य काही लोकनाट्ये आहेत. अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले.
अण्णाभाऊ साठे हे कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक होत. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी गुन्हेगार म्हणून शिक्का मारलेल्या एका जमातीत त्यांचा जन्म दि.१ ऑगस्ट १९२० रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव सिधोजी साठे तर आईचे नाव वालबाई होते. त्यांचे मूळ नाव तुकाराम होते. त्यांचे जन्मस्थळ वाटेगाव, ता.वाळवा, जि.सांगली होय. त्यांचे शालेय शिक्षण झालेले नव्हते; तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळविले. सन १९३२साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे, मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी, अशी मिळतील ती कामे त्यांनी केली. मुंबईत कामगारांचे कष्टमय, दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले व अनुभवलेही. त्यांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला. सन १९३६मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले. मुंबईत विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक नेत्यांची भाषणे त्यांनी ऐकली. पक्षाचे कामही ते करीत होतेच; तथापि वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी अंगावर पडल्याने ते पुन्हा आपल्या गावी आले. तेथे बापू साठे या चुलतभावाच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागले. पुढे सन १९४२च्या चळवळीत सहभागी झाल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर पकड वॉरंट काढले. पोलिसांना चुकवीत ते मुंबईला आले. मुंबईत लोकशाहीर म्हणून त्यांचा लौकिक झाला. त्यावेळी अमर शेख या ख्यातनाम मराठी लोक शाहीरांबरोबर अण्णाभाऊंचेही नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागले. त्यांनी लिहिलेला स्तालिनग्राडचा पवाडा सन १९४३ साली पार्टी या मासिकात प्रसिद्घ झाला. त्यांनी सन १९४४ साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने लाल बावटा कलापथक स्थापन केले. या कलापथकावर सरकारने बंदी घातली. अमळनेरचे अमर हुतात्मे आणि पंजाब-दिल्लीचा दंगा या त्यांच्या काव्यरचना सन १९४७ साली प्रसिद्घ झाल्या. पंजाब-दिल्लीचा दंगा या रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.
अण्णाभाऊंच्या साहित्यात त्यांची कथा-कादंबरीची निर्मितीही ठळकपणे नजरेत भरते. जिवंत काडतूस, आबी, खुळंवाडी, बरबाद्या कंजारी, चिरानगरची भुतं, कृष्णाकाठच्या कथा हे त्यांचे काही कथासंग्रह; त्यांनी पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या. चित्रा ही त्यांची पहिली कादंबरी. त्यानंतर ३४ कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांत फकिरा, वारणेचा वाघ, चिखलातील कमळ, रानगंगा, माकडीचा माळ, वैजयंता यांसारख्या कादंबऱ्यांचा समावेश होतो. त्यांच्या फकिरा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. वास्तव, आदर्श आणि स्वप्नरंजन यांचे मिश्रण त्या कादंबरीत आहे. सत्प्रवृत्तीचा, माणुसकीचा विजय हे अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांचे मुख्यसूत्र होय. त्यांच्या या कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले- वैजयंता, टिळा लावते मी रक्ताचा, डोंगरची मैना, मुरली मल्हारीरायाची, वारणेचा वाघ, अशी ही साताऱ्याची तऱ्हा, फकिरा या शिवाय इनामदार, पेंग्याचं लगीन, सुलतान ही नाटकेही त्यांनी लिहिली. उपेक्षित गुन्हेगार म्हणून कलंकित ठरवले गेलेले, दलित आणि श्रमिक यांच्या समृद्घीचे स्वप्न अण्णाभाऊ पाहात आले. महामानव डॉ.बाबासाहेबांच्या लढाऊ आणि विमोचक विचारांचे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर झालेले होते. जग बदल घालुनी घाव। सांगूनि गेले मज भीमराव॥ हे त्यांचे गीत खूप गाजले. त्यांनी लिहिलेल्या लावण्यांत माझी मैना गावावर राहिली आणि मुंबईची लावणी या अजोड आणि अविस्मरणीय आहेत. अतिशय तळमळीने लिहिण्याची त्यांची वृत्ती होती. पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे, असे ते म्हणत. हाच त्यांच्या लेखनाचा प्रेरणा स्रोत होता. मानवी जीवनातील संघर्ष, नाटय, दुःख, दारिद्र्य त्यांच्या साहित्यातून प्रकट होते. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतून त्यांनी उभ्या केलेल्या माणसांत जबरदस्त जीवनेच्छा दिसते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन दलित लेखकांची एक प्रतिभावान पिढी निर्माण झाली. त्यात बाबूराव बागूल, नामदेव ढसाळ, लक्ष्मण माने, यशवंत मनोहर, दया पवार, केशव मेश्राम, शरणकुमार लिंबाळे आदींचा अंतर्भाव होतो. पुढे पुढे मात्र दारिद्र्य आणि एकाकी आयुष्य त्यांच्या वाट्याला प्रकर्षाने आले. मराठी साहित्यातील प्रतिष्ठितांकडून त्यांची उपेक्षा झाली. विपन्नावस्थेत गोरेगाव- मुंबई येथे त्यांचे दि.१८ जुलै १९६९ रोजी निर्वाण झाले. मरणोपरांत महाराष्ट्रातील विद्यापीठांत अण्णाभाऊंवर अकरा प्रबंध सिद्घ केले आहेत. पुणे विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ अण्णाभाऊ साठे अध्यासन सुरू करण्यात आले आहे. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची केवळ भारतीयच नव्हे, तर २२ परकीय भाषांत भाषांतरे झाली आहेत.
!! ख्रिश्चन परिवारातर्फे स्मृतिदिनी त्यांना व त्यांच्या शब्दसाधनेला मानाचा लवून मुजरा !!

– संकलक –
श्री एन. कृष्णकुमार.
से. नि. अध्यापक.
गडचिरोली, ७७७५०४१०८६.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here