– ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केली घोषणा
The गडविश्व
मुंबई : राज्यातील थकीत विद्युत बिलाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एक रकमी थकबाकी भरल्यास सर्व वीज ग्राहकांना व्याज आणि विलंब शुल्क माफ करण्यात येणार आहे. राज्यातील वीज ग्राहकांसाठी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी लोणार येथे ही मोठी घोषणा केली आहे.
कोरोनाच्या काळात मिटर बंद असल्यामुळे एकाच वेळी वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिल पाठवण्यात आली होती. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. काही ठिकाणी वीज मिटर नसतानाही बिलं आली होती. त्यामुळे महावितरणच्या कारभारावर चहुबाजूने टीका होत होती. अजूनही काही ठिकाणी वीज ग्राहक आपली वीज कनेक्शन कट होऊ नये म्हणून टप्याटप्याने वीज बिल भरत आहे.
दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावाने नवी योजना जाहीर करण्यात आली आहे. विलासराव देशमुख अभय योजना ऊर्जा मंत्री राऊत यांनी जाहीर केली आहे. सोबतच उच्चदाब वीज ग्राहकांना एकरकमी वीज बिल भरल्यास 5 टक्के रकम माफ करण्यात येणार आहे. तसेच लघुदाब वीज ग्राहकांनी एकरकमी वीज बिल भरल्यास 10 टक्के रकम माफ केली जाईल. मात्र कृषि पंप ग्राहकांना दिलासा देण्यात आलेला नाही.