ताडोबात मृतावस्थेत आढळला पट्टेदार वाघ

775

The गडविश्व
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील आंबेउतारा नियतक्षेत्र , रानतळोधी कारवा रेंजमधील वनखंड क्रमांक २९० मधील आंबेउतारा ओढ्यात आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास पट्टेदार नर वाघ मृतावस्थेत आढळून आला. सदर मृत वाघ हा सुमारे ४.५ वर्षे वयाचा असल्याचा अंदाज असून तो T 161 या नावाने ओळखल्या जायचा.
एप्रिल २०१९ मध्ये T19 या वाघिणीच्या १ नर व २ मादी अशा तीनही बछड्यांना रेडिओ कॉलर लावण्यात आली होती . रेडिओ कॉलरचा शेवटचा सिग्नल ऑगस्ट २०१९ मध्ये प्राप्त झाला होता , त्यानंतर २०२० आणि २०२१ मध्ये T 161 हा नर वाघ व्यवस्थितपणे फ़िरत असल्याचे कॅमेरा ट्रॅपमुळे लक्षात आले होते . मात्र तांत्रिक दोषामुळे त्याची रेडिओ कॉलर काढून टाकता आली नाही . व २०१९ मध्ये कॉलर काढण्यासाठी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला . परंतु त्यात यश आले नाही . त्यानंतर प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात कॅमेरा ट्रॅपमध्ये अधून – मधून या वाघाचे फोटो मिळत होते व वाघाचे आरोग्य उत्तम असल्याचे दिसून येत होते . मात्र फेब्रुवारी २०२२ मध्ये मिळालेल्या छायाचित्रात या वाघाच्या गळ्याभोवती जखम दिसून आली . म्हणून कॉलर काढण्यासाठी त्याच्यावर लक्ष ठेवून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले होते . परंतु घनदाट जंगलात तो सतत फ़िरत असल्यामुळे ते प्रयत्न अयशस्वी झाले. २९ मार्च रोजीही आंबेउतारा ओढ्याजवळ हा वाघ दिसला होता , मात्र त्याला पकडता आले नाही . ३० मार्च रोजी सकाळी ८ वाजता शोधकार्यात असणाऱ्यां पथकाला नाल्यात वाघाचा मृतदेह आढळला . शव विच्छेदनाकरीता त्याला चंद्रपूर येथील तात्पुरत्या उपचार केंद्रात नेण्यात आले .
चंद्रपूर प.वि.अ. डॉ . एकता शेडमाके , वरोरा प.वि.अ. डॉ . राहुल शेंद्रे , पशुवैद्य , ता.अं.व्या.प्र .डॉ . कुंदन पोडचेलवार यांनी शवविच्चेदन केले . यावेळी ता.अं.व्या.प्र क्षेत्र संचालक डॉ . जितेंद्र रामगावकर, उ . सं . कोर विभाग नंदकिशोर काळे, स.व.सं. महेश खोरे, कारवा वपअ श्रीमती . कृष्णापूरकर , कोळसा वपअ रामटेके, हे उपस्थित होते . याबरोबरच प्रधान मुख्य वनसंरक्षक ( व.जी. ) यांचे प्रतिनिधी म्हणून बंडू धोत्रे व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी म्हणून मुकेश भांदककर हेही शवविच्छेदनाच्या वेळी उपस्थित होते . शवविच्छेदनाच्या प्राथमिक निष्कर्षानुसार गळ्याभोवती झालेल्या जखमेमुळे रक्तदोष उद्भवला . वाघाचे अंतर्गत अवयव पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येत असून त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होणे अपेक्षित आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here