जीवनविद्या मिशनच्या सहभागाने आता होईल ग्रामसमृद्धी : ग्रामविकास तसेच कामगार मंत्री हसन मुश्रीफ

278

The गडविश्व
मुंबई : महाराष्ट्रातील अविकसित गावे दत्तक घेऊन त्या गावाचा सर्वांगिण विकास करण्याचे तसेच राज्यातील गावे सर्वच बाबतीत आदर्श बनविण्याचे माझे स्वप्न आहे. प्रत्येक गाव अधिकाधिक सुखी, समृद्ध व सक्षम करण्यासाठी तसेच दत्तक घेतलेली गावे ही आदर्श गावे बनविण्यासाठी जीवनविद्या मिशन, मुंबई आणि ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामसमृद्धी अभियान राबविण्यात येणार असल्याचे ग्रामविकास तसेच कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज सांगितले.
थोर समाजसेवक वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशन ही समाजातील सर्व स्तरातील अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, पर्यावरण जागृती, स्त्री सन्मान, विद्यार्थी याबाबत संस्कार अभियान, कार्यशाळा असे विविध प्रकारची कार्य करत आहे. ग्रामीण भागातील जनतेसाठी जीवनविद्या मिशनने 60 गावे दत्तक घेतली असून त्यापैकी 20 गावांमध्ये जीवनविद्या मिशनने कार्य सुरू केले आहे. यातील 4-5 गावांमध्ये अतिशय परिणामकारक बदल दिसून आला असल्याने ग्रामविकास विभागाकडे जीवनविद्या मिशनने सादर केलेल्या ग्रामसमृद्धी अभियानाच्या प्रस्तावास मंजुरी दिली असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले की, गावातील भौतिक विकासासाठी सरकारी, निमसरकारी तसेच खासगी संस्था, उद्योग समुहाचे आर्थिक सहकार्य मिळवून जीवनविद्या मिशनचे प्रशिक्षित कार्यकर्ते हे विकासकामे करणार आहेत. ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत घरोघरी करण्यात आलेल्या सर्व्हेचा अभ्यास करून तसेच ग्रामपंचायतीसोबत सभा घेऊन गावांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी भर देण्यात येणार आहे. यात हागणदारी मुक्त गाव, प्लास्टिक बंदी, शून्य कचरा मोहीम, घनकचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, स्त्री सन्मान, महिला सक्षमीकरण, महिला बचत गट, नोकरी किंवा व्यवसाय मागदर्शन, स्वयंरोजगार व रोजगार संधी, शेतकरी वर्गाला संघटित करणे, सरकारी योजना सर्वदूर पोहचविणे व राबविणे, शासकीय लाभ घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे, नैसगिक साधनसंपत्तीचा मोजका वापर करण्यास शिकवणे, गाव व्यसनमुक्त करणे, राष्ट्रहित भावना वृद्धींगत करून उत्कृष्ठ नागरिक घडवणे अशा विविध उद्दिष्टांवर भर देण्यात येणार आहे.
ग्रामसमृद्धीचे कार्य करण्यासाठी जीवनविद्या मिशन संस्थेला शासनाची सहयोगी मागदर्शक संस्था म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. मात्र जीवनविद्या मिशन, मुंबई या संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ग्रामसमृद्धी अभियानासाठी येणारा खर्च सरकारी योजनेतून करण्यात येणार नसून संस्थेमार्फत किंवा लोकवर्गणीतून करण्यात येणार आहे. या अभियानामुळे गावातील प्रत्येकाचा मानसिक, आध्यात्मिक, आर्थिक आणि शारिरीक स्तर उंचावणार असल्याची आशा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here