जागतिक महासागर दिवस विशेष : एवढा जलस्रोत, जगाच्या पाठीवर कोठेच नाही!

206

जागतिक महासागर दिवस विशेष

संपूर्ण विश्वातील महासागरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस वार्षिक स्वरूपात साजरा केला जातो. महासागर हे संरक्षिले जावेत आणि नैसर्गिकदृष्ट्या असलेले त्यांचे महत्व जपले जावे, असा यामागे हेतू आहे. प्राणवायू, वातावरणाचे नियमन, अन्नाचा पुरवठा, औषधे आणि अन्य बाबींसाठी महासागरांचे स्थान महत्त्वाचे आहे. या निमित्ताने व्यक्तिगत व सामूहिक पातळीवर त्याच्या रक्षणाची संधी घेतली जाते. समुद्राबद्दल ज्ञानवर्धक माहिती एन. कृष्णकुमार यांच्या या लेखात जरूर वाचा.

आंतरराष्ट्रीय समुद्र दिनानिमित्ताने संयुक्त राष्ट्रांचे सर्व सदस्य देश, त्यांतील सागरी परिसंस्थेशी संबंधित संस्था, अनेक स्वयंसेवी संस्था, संशोधक-अभ्यासक मिळून समुद्राविषयीचे विविध पैलू जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतात. सर्वांनाच सागराबद्दल कुतूहल असते. अर्धी पृथ्वी जरी आपण तिच्या नैसर्गिक स्वरूपात राखू शकलो, तरी तब्बल दहा लाख प्रजातींना नष्ट होण्यापासून आपण वाचवू शकतो, असा शास्त्रज्ञांचा अभ्यासपूर्ण दावा आहे. सांडपाणी, औद्योगिक प्रदूषके, मुदत संपलेली किंवा घातक रसायने, प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्या समुद्रात टाकल्या जातात. “कचरा कोणताही असो, फेका समुद्रात! अहो केवढा मोठा आणि खोल समुद्र असतो? अफाट समुद्राला एवढ्याशा कचर्‍याने काय होतेय?” असा गैरसमज जगभरातील व्यक्तीपासून राष्ट्रांपर्यंत बहुतेक सर्वांचाच होत असल्यामुळे आता मात्र परिस्थिती गंभीर बनली आहे. मासे मिळवण्यासाठी अधिकाधिक खोल समुद्रात जावे लागत आहे, पाण्याचा दर्जा घसरला आहे. हवामानावर परिणाम होत आहे. विशिष्ट सजीव नष्ट होऊ लागले आहेत… हे सारे थांबविणे, हेच या दिनाचे खरे ध्येय धोरण आहे.
जागतिक महासागर दिन जगभर ८ जून रोजी पाळला जातो. सन २००८ सालापासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस अधिकृतरीत्या पाळण्याचे ठरविले. त्यापूर्वी सन १९८२पासून कॅनडामध्ये तो साजरा होत असे. कॅनडास्थित आंतरराष्ट्रीय संस्था महासागरांच्या संरक्षणासाठी कार्यरत आहे, या संस्थेच्या पुढाकाराने सर्वप्रथम या दिवसाची सुरुवात झाली. वर्ल्ड ओशन नेटवर्क सारख्या विविध संस्था, मत्स्यालये, प्राणिशास्त्र विषयात काम करीत असलेल्या संस्था, अशा महत्त्वाच्या संस्था यासाठी एकत्रितपणे योगदान देतात.
संपूर्ण विश्वातील महासागरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस वार्षिक स्वरूपात साजरा केला जातो. महासागर हे संरक्षिले जावेत आणि नैसर्गिकदृष्ट्या असलेले त्यांचे महत्व जपले जावे, असा यामागे हेतू आहे. प्राणवायू, वातावरणाचे नियमन, अन्नाचा पुरवठा, औषधे आणि अन्य बाबींसाठी महासागरांचे स्थान महत्त्वाचे आहे. या निमित्ताने व्यक्तिगत व सामूहिक पातळीवर त्याच्या रक्षणाची संधी घेतली जाते. ८ जून हा दिवस विश्व महासागर दिन- वर्ल्ड ओशन डे म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण जगभरात या दिवसाला विशेष महत्व आहे. संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस अधिकृतरीत्या साजरा करण्यास का सुरूवात केली? तर समुद्र दूषित होण्याचे प्रमाण वाढल्याने त्यासंबंधी जनजागृती करणे आवश्यक बनले आहे. या संदर्भातला प्रस्ताव सन १९९२ साली कॅनडाने ब्राझीलमध्ये झालेल्या वसुंधरा शिकार परिषदेत मांडला. त्याला संयुक्त राष्ट्रसंघाने सन २००८मध्ये मान्यता दिली. तेव्हापासून दी ओशन प्रोजेक्ट या अमेरिकन संस्थेच्या सहकार्याने हा महासागर दिन आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा होत आहे. दरवर्षी एखादा ध्येय ठेऊन हा दिवस साजरा केला जातो. सन २०१८मध्ये प्लास्टिकपासून महासागराचे रक्षण, हे ध्येय ठेवण्यात आले होते. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळाच्या ७१ टक्के भूभाग हा विविध प्रकारच्या जलस्रोतांनी व्यापला आहे आणि त्यापैकी तब्बल ९७ टक्के जलसाठा हा खाड्या, समुद्र व महासागरांच्या रूपात आहे.
दी ओशन प्रोजेक्ट या सन १९९७ साली अमेरिकेत स्थापन झालेल्या आणि आता जागतिक झालेल्या प्राणिसंग्रहालये, मत्स्यालये, संग्रहालये यांच्या संघटनेने एकच महासागर ही संकल्पना मांडली. परंतु भौगोलिकदृष्ठ्या आणि राजकीयदृाही या एकच महासागराची पाच खंडांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे समुद्र हा खाद्य आणि विपुल प्रमाणात ऑक्सिजन पुरविणारा स्रोत आहे. तोच जैवविविधतेचे महाकाय भांडार आहे. खरे तर तोच अनेकविध रत्ने, खनिजे, तेल आपल्या उदरात बाळगणारा रत्नाकर होय. ही सर्व वर्णने अपुरी पडतील, अशा अगणित मार्गानी महासागर मानवासाठी व एकूणातच चराचर सृष्टीसाठी महत्त्वपूर्ण आहे. महासागर कितीही विशाल असले तरी माणसाने केलेला किती कचरा त्यांनी पोटात घ्यावा यालाही अखेर काही मर्यादा आहे. आपण ही मर्यादा ओलांडल्यामुळे तेथील जीवसृष्टीला आणि अन्नसाखळ्यांना धक्का बसला आहे. यामुळे माणसाला मिळणारे मासे तर कमी झाले आहेतच, शिवाय हवामानावरही विपरीत परिणाम होत आहे. मीठागरांना फटका बसत आहे. समुद्रीजल प्रदूषणांमुळे मीठाचे खारेपण ओसरू लागले आहे. शुद्धीकरणास अधिक खर्च येऊ लागला आहे. तेथील मानवी हस्तक्षेप व ढवळाढवळीच्या कारणाने पावसाच्या प्रमाणात चढउतार दिसू लागला आहे. महासागरास जाऊन मिळणाऱ्या घाणेरड्या पाण्याचे प्रमाण हे जास्त, तर अस्सल पाण्याचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. यावरही माणसाला विचार करावाच लागेल, हे निश्चित!

!! गडविश्व न्यूज नेटवर्क परिवारातर्फे आंतरराष्ट्रीय समुद्र दिनाच्या समस्त सूझवान मानवांना हार्दिक शुभेच्छा !!

 

– संकलक –
श्री. एन. कृष्णकुमार, से.नि.अध्यापक.
(भारतीय थोरपुरुषांचे जीवनचरित्र अभ्यासक)
गडचिरोली, व्हा.नं. ७४१४९८३३३९.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here