जंगल परिसरात दारू काढणाऱ्यांवर कारवाई करा

542

– आरमोरी तालुका समितीची बैठक संपन्न
The गडविश्व
गडचिरोली : गावालगतच्या जंगल परिसरात हातभट्या लावून दारू काढण्यासाठी अवैध वृक्षतोड केली जात आहे.त्याकडे वन विभागाने लक्ष घालून कडक कारवाई करावी, असा निर्णय मुक्तीपथ तालुका समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
आरमोरी येथील तहसील कार्यालयात दारू तंबाखूमुक्त जिल्हा विकास कार्यक्रमाअंतर्गत तालुका समितीची बैठक तहसीलदार कल्याण कुमार दहाट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे, सीडीपीओ के.पी.कटरे, नगर परिषदेचे जेई मिथुन गोरखेडे, टीएचओ डॉक्टर आनंद ठीकरे, आर.टी.पारधी, गटशिक्षण अधिकारी नरेंद्रकुमार, तालुका संघटिका संघटित भारती उपाध्याय, संग्राम सावंत, अविनाश मेश्राम,प्रभारी तालुका कृषी अधिकारी ज्योत्स्ना घरत आदी उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील उर्वरित नऊ ग्रामपंचायत समित्या गठित करण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकांना आदेश द्यावे. शहरातील किराणा दुकान व पानठेल्यांची नोंदणी नगर परिषद मार्फत करण्यात यावी. येणारी पिढी व्यसनमुक्त करण्यासाठी तालुक्यातील 105 शाळांमध्ये व्यसनमुक्त कार्यक्रम घेण्यात आला असून उर्वरित शाळांमध्ये पुढील सत्रात सदर कार्यक्रम घेण्यात येणार आहे. मुक्तीपथ तालुका समितीद्वारे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच व पोलीस पाटील यांनी गावातील दारू बंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी तहसीलदार यांच्या पत्रान्वये कळविण्यात येणार आहे. शासकीय व निमशासकीय कार्यालय तंबाखू मुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले.गावागावात होणाऱ्या व्यसन उपचार शिबिरासाठी गावातील ग्रामसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, आरोग्य सेविका यांनी सहकार्य करून ते शिबिर यशस्वी करावे आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली तसेच गुटख्याची जाहिरात करणाऱ्या हिरोंच्या सिनेम्यावर राज्य शासनाने बंदी घालावी, असे मत तहसीलदार यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here