-चामोर्शी पोलिस व गाव संघटनेची संयुक्त कृती
The गडविश्व
गडचिरोली, २४ सप्टेंबर : चामोर्शी तालुक्यातील पाविमुरांडा जंगलपरिसरात पोलिस, गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या शोधमोहीम राबवित एक ड्रम मोहफुलाचा सडवा व देशी दारू नष्ट केली आहे. याप्रकरणी एका विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाविमुरांडा ग्रामपंचायत अंतर्गत गाव संघटनेने सभा घेऊन गावात दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. सोबतच दारूविक्रेत्यांच्या घरोघरी भेट देऊन अवैध व्यवसाय बंद करण्याचे ठणकावून सांगितले होते. गाव संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही विक्रेत्यांनी अवैध दारूविक्री करणे बंद केले होते. यामुळे मागील दोन महिन्यांपासून गावातील दारूविक्री बंद आहे. अशातच, काही मुजोर विक्रेत्यांनी चोरट्या मार्गाने दारूविक्रीचा व्यवसाय सुरु केल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे चामोर्शी पोलिस, गाव संघटनेच्या महिला व मुक्तिपथ तालुका चमूने जंगलपरिसरात शोधमोहीम राबविली असता, एका ठिकाणी एक ड्रम मोहफुलाचा सडवा व 35 नग देशी दारू आढळून आली. संपूर्ण मुद्देमाल नष्ट करीत एका विक्रेत्यावर चामोर्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलिस निरीक्षक बिपीन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय साठे, बिट अंमलदार गणेश बैस यांच्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी केली. यावेळी ग्रापं सदस्य सुनिता झुरी, गाव संघटनेच्या सुनीता मुलगुलवार, आशा सुरपाम, संगीता पेंदाम, कविता मडावी, मेघा चाहकाटे, विमल मडावी, रंजना पांडे, कविता रायसिडाम यांच्यासह ४० महिला उपस्थित होत्या.