चोवीस तास वीजपुरवठ्याच्या आश्वासनांची पुर्तता करा

264

– आमदार कृष्णा गजबे यांची संबंधित मंत्र्यांकडे मागणी
The गडविश्व
देसाईगंज : संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील खरीप हंगाम प्रभावीत झाल्याने येथील शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई भरुन काढण्यासाठी उपलब्ध सिंचन सुविधेच्या भरोशावर उन्हाळी धान फसल लागवड केली. मात्र संपुर्ण फसल विद्युत पुरवठ्यावर अवलंबून असताना शेतकऱ्यांना करण्यात येत असलेल्या खंडीत वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसानीला सामोरे जाण्याची संभाव्य शक्यता लक्षात घेता चोवीस तास वीजपुरवठा करण्याबाबत दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करा अन्यथा सभागृहाच्या पायऱ्यांवर बसुन विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे उर्जा मंत्री नितिन राऊत तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनातुन दिला आहे.
धान पिकाला सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असते. जिल्ह्यातील पर्जन्यमान बघता पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु जिल्ह्यात महावितरण कंपनी कडून कृषि पंपांना केवळ ८ तास वीज पुरवठा करण्यात येत असल्याने पुरेसे पाणी उपलब्ध असुनही विजे अभावी शेतकऱ्यांना नापिकीमुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. महावितरण जरी ८ तास वीज पुरवठा करीत असली तरी तांत्रिक बिघाडामुळे शेतकऱ्यांना ८ 8 तासांपैकी ४-५ तासही सलग विज मिळत नाही.
त्यातही आठवड्यातून ४ दिवस रात्री विज पुरवठा करण्यात येत असल्याने संपूर्ण जिल्हा घनदाट जंगलाने व्यापलेला असल्याने जंगली श्वापदांच्या दहशतीत शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून पिकांना रात्री अपरात्री शेतात पिकांना ओलीत करण्यासाठी जावे लागते‌. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जिवीतासही धोका निर्माण झालेला आहे.यासर्व बाबींमुळे आरमोरी मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालेले असल्याने जिल्ह्यातील शेतकरी गडचिरोली जिल्ह्यात कृषी पंपांना २४ तास विज पुरवठा करण्याची सातात्याने मागणी करीत आहेत.
शेतकऱ्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे ऊर्जामंत्री यांना निवेदन देवून गडचिरोली जिल्ह्यात कृषि पंपांना २४ तास विज पुरवठा करण्याची सातात्याने मागणी केली. परंतु सदर मागणी पूर्ण होत नसल्याने आमदार कृष्णा गजबे यांनी १० जानेवारी २०२२ रोजी मतदार संघातील शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थित देसाईगंज येथे महावितरण कार्यालयासमोर तिव्र धरणे व चक्का जाम आंदोलन केले होते. आंदोलन चिघळल्यामुळे आमदार कृष्णा गजबे यांना पोलिसांनी अटक सुद्धा केली होती. आंदोलनाची तिव्रता व मागणीचे सातत्य लक्षात घेता राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री यांनी १० जानेवारी २०२२ रोजी विशेष बाब म्हणून मंत्री मंडळ बैठकीत चर्चा करुन गडचिरोली जिल्ह्यातील कृषि पंपांना २४ तास विज पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन दिले होते.त्यानंतरही आमदार कृष्णा गजबे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.परंतु २ महीन्याचा कालावधी लोटुनही आश्वासनांची पूर्तता करुन गडचिरोली जिल्ह्यात अजुनही कृषि पंपांना २४ तास विज पुरवठा करण्यात येत नसल्याने आमदार कृष्णा गजबे यांनी मुंबई येथे सुरू होत असलेल्या अधिवेशनात विधानभवनाच्या पाय-यांवर बसून आंदोलन व सभागृहात संसदीय आयुधाच्या माध्यमातून शासनाला जाब विचारला जाईल तसेच मतदार संघातील सर्व तालुक्यांत राज्य शासनाच्या विरोधात पुर्वी पेक्षा तिव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिलेल्या निवेदनातुन दिला असल्याने याबाबत शासकीय स्तरावरुन काय निर्णय घेतल्या जाते याकडे येथील शेतकऱ्यांचे लक्ष लागुन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here