चातगाव येथील ‘सर्च’ रुग्णालयात ‘लठ्ठपणाच्या’ ओपीडी ला सुरुवात

175

– मुंबई चे तज्ञ डॉ. संजय बोरूडे (Metabolic and Bariatric Surgeon) करणार लठ्ठपणा असलेल्या रुग्णांची तपासणी
– २९ जुलै रोजी पहिली ओपीडी

The गडविश्व
गडचिरोली, २५ जुलै : शरीरात गरजेपेक्षा जास्त प्रमाणात मेद असणे यास लठ्ठपणा असे म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार बॉडी मास इंडेक्स ३० च्या वर असणे यास लठ्ठपणा असे म्हणतात. गरजेपेक्षा जास्त उष्मांक घेणे आणि शारीरिक हालचाली कमी करणे हे लठ्ठपणामागचे प्रमुख कारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतीय व्यक्तीनी अनेक रोग टाळण्यासाठी त्यांचा बीएमआय हा २५ किंवा त्यापेक्षा कमी ठेवावा. लठ्ठपणामुळे अनेक रोग होण्याची शक्यता वाढते जसे की हृदयरोग आणि स्ट्रोक, धमन्यांचे आजार, मधुमेह, झोपताना श्वास बंद पडणे, काही प्रकारचे कर्करोग आणि मनोऔदासिन्य, पित्ताशयाचे रोग आणि पित्ताशयातील खडे, संधिरोग, श्वासोच्छवासाच्या समस्या आणि दमा यामुळे काळाची गरज समजून आणि रुग्णांमधील गुंतागुंतीच्या वाढत्या प्रवृत्तीचा विचार करून चातगाव येथील ‘सर्च’ हॉस्पिटलमध्ये लठ्ठपणाच्या ओपीडीला सुरुवात करण्यात आली आहे.
मुंबई येथील तज्ज्ञ डॉ. संजय बोरूडे यांच्या सहकार्याने ‘सर्च’ हॉस्पिटल मध्ये नियमित लठ्ठपणा ओपीडी सुरू झाली आहे. २९ जुलै २०२२ या दिवशी ‘सर्च’ मध्ये लठ्ठपणा विषयाची पहिली ओपीडी घेण्यात येणार असून डॉ. संजय बोरूडे स्वतः या ओपीडीसाठी उपस्थित राहणार आहेत व रुग्णांची तपासणी करणार आहे. विशेष म्हणजे डॉ. बोरूडे हे महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे व्याही असून त्यांनी आतापर्यंत विविध प्रकारच्या अनेक यशस्वी शस्त्रक्रिया केल्या असून ते प्रसिद्ध डॉक्टर आहे. तरी लठ्ठपणाच्या विकाराने त्रस्त असलेल्या जास्तीत जास्त रुग्णांनी या ओपीडीचा लाभ घ्यावा तसेच गैरसोय होऊ नये म्हणून हॉस्पिटल मध्ये पूर्व नोंदणी करावी असे आवाहन ‘सर्च ‘कडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here