– जवळपास १ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट
The गडविश्व
गडचिरोली : तालुक्यातील चांदाळा जंगलपरिसरात शोधमोहीम राबवून जवळपास १ लाख १० हजार रुपये किंमतीचा १७ ड्रम मोहफुलाचा सडवा नष्ट केल्याची कारवाई मुक्तिपथ व गडचिरोली पोलिसांनी संयुक्तरित्या मंगळवारी केली.
चांदाळा येथे अवैध दारूविक्री केली जाते. या गावातील विक्रेत्यांकडे परिसरातील मद्यपींची दररोज गर्दी असते. तसेच गडचिरोली जिल्हा मुख्यालयासह बोदली, बाम्हणी, खरपुंडी आदी गावांतील किरकोळ विक्रेत्यांना दारूचा पुरवठा केला जातो. जंगलपरिसरात ठिकठिकाणी मोहफुलाचा सडवा टाकला असल्याची माहिती मिळताच अवैध दारू विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले. त्यानुसार गडचिरोली पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने चांदाळा शेताशिवरात व जंगलपरिसरात शोधमोहीम राबविली. दरम्यान विविध ठिकाणी आढळून आलेला १७ ड्रम मोहफुलाच सडवा नष्ट करण्यात आला.
मागील दहा दिवसांच्या कालावधीत चांदाळा परिसरात पोलिस व मुक्तीपथने संयुक्तरित्या मोहीम राबवत ही तिसरी कारवाई केली आहे. यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली ना.पो शि धनराज चौधरी, पोशि परशुराम हलामी, पोशि सुजाता ठोंबरे यांनी केली. यावेळी मुक्तीपथ तालुका उपसंघटक रेवनाथ मेश्राम उपस्थित होते.