चंद्रभागेचे पाणी पिण्यास अयोग्य : भूजल सर्वेक्षण विभागाच्या तपासणी अहवालात स्पष्ट

273

– तीर्थ म्हणून प्राशन न करण्याचे आवाहन
The गडविश्व
पंढरपूर : माघी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या पात्रात नव्याने पाणी सोडण्यात आले आहे मात्र चंद्रभागेचे पाणी पिण्यास अयोग्य आहे. त्यामुळे तीर्थ म्हणून प्राशन न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी हे पाणी तपासणीसाठी महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वेक्षण विभागाला दिले होते. काल आलेल्या तपासणी अहवालात हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल देण्यात आला आहे.
पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या पात्रात असलेल्या दूषित पाण्यामुळे भाविकांना त्वचा रोग होऊ लागल्याच्या तक्रारी आल्यानंतर ABP माझाने ही भीषण अवस्था दाखवली होती. यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तातडीने आदेश देत चंद्रभागेच्या पात्रामध्ये नवीन पाणी सोडायची व्यवस्था केली आहे. आज माघी एकादशी असून यात्रेसाठी तीन लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात पोहोचले आहेत.
विठ्ठल दर्शनापूर्वी पवित्र चंद्रभागा स्नानाची परंपरा वारकरी संप्रदायात असल्याने हजारो भाविकांनी शुद्ध पाण्यात स्नानाचा आनंद घेतला. चंद्रभागेवरील गुरसाळे बंधाऱ्यातून परवा सायंकाळी पाणी सोडण्यास सुरुवात केल्याने पूर्वीचे प्रदूषित झालेले अळ्यायुक्त पाणी आता वाहून गेले असून त्याठिकाणी हे नवीन पाणी पोचल्याने भाविकांना चांगल्या पाण्यात स्नान करता येत आहे. मात्र हे पाणी न पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पंढरपुरात येणाऱ्या रस्त्यावर शेकडो पायी दिंड्या हरिनामाचा गाजर करीत पोहोचत असून विठ्ठल दर्शनाच्या रांगेत काल एक लाख भाविक होते. देवाच्या दर्शनाची रांग मंदिरापासून गोपाळपूर मार्गाकडे गेली असून दर्शनाला आठ ते दहा तासांचा वेळ लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here