गावात दारूविक्री केल्यास ठोठावणार दंड

273

– कोठारी ग्रापं समितीचा इशारा
The गडविश्व
गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील कोठारी येथील ग्रापं समितीने घरोघरी जाऊन दारूविक्रेत्यांना समज दिली. तसेच पुन्हा अवैध दारूविक्री केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
कोठारी ग्रामपंचायत कार्यालयात मुक्तिपथ गाव संघटनेची बैठक पार पडली. यावेळी ग्रामपंचायत समिती पुनर्गठित करण्यात आली. तसेच गावात नव्याने सुरु झालेली अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी चर्चा करण्यात आली. तसेच अवैध दारूविक्री बंद करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यानंतर ग्रामपंचायत समितीने गावातील सहा दारूविक्रेत्यांच्या घरी भेट देऊन समज देत पुन्हा दारूविक्री न करण्याचे सांगण्यात आले. तसेच अवैध व्यवसाय केल्यास दंडात्मक व कायदेशी कारवाई करण्याचे सुद्धा ठणकावून सांगण्यात आले.
कोठारी येथे मागील आठ वर्षांपासून अवैध दारूविक्री बंद होती. मात्र, गेल्या एक महिन्यापासून गावातील काही विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरु केला आहे. त्यामुळे गावातील दारूबंदी कायम ठेवण्यासाठी ग्रापं समितीने पुढाकार घेऊन दारूविक्रेत्यांना समज दिली. यावेळी विक्रेत्यांनी आपण पुन्हा दारूविक्री करणार नाही, अशी ग्वाही दिली. यावेळी सरपंच रोशनी कुसनाके, ग्रामसेवक कागदेलवार, तालुका संघटक रुपेश अंबादे, ग्रापं सदस्य कालिदास कुसनाके, ग्रामकोष समिती अध्यक्ष सत्यवान कडते, समितीचे सचिव दिवाकर तलांडे, अंगणवाडी सेविका बेबी मडावी, दहागावकर, संघटना अध्यक्ष रसिका मडावी, सचिव कमला कडते, आशावर्कर अंतकला मडावी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here