– चंद्रपूर क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय प्रबंधक रमेश खाडे यांनी दाखवली हिरवी झेंडी
The गडविश्व
गडचिरोली : रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकारच्या वित्तीय साक्षरता सप्ताहाचे आयोजन १४ ते १८ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. आज गडचिरोली येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक येथे या अभियानाला चंद्रपूर क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय प्रबंधक रमेश खाडे यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आले.
रिझर्व बँकेचे “गो डिजिटल गो सेक्युअर” हा संदेश जनसामान्य लोकामध्ये पोहोचविण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण १९ शाखेमध्ये वित्तीय साक्षरता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियान कार्यक्रमात वित्तीय साक्षरता अभियान रथ बनविण्यात आलेला असून या रथाद्वारे जिल्हाभरात जनतेमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्हा ग्रामीण बँकेच्या गडचिरोली शाखेत वित्तीय साक्षरता केंद्राची स्थापना करण्यात आली असून ग्रामीण भागात जन जागृती करण्यासाठी संपूर्ण सोईसह मोबाईल व्हॅन कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या रथाद्वारे जिल्ह्यातील नागरिकांना आर्थिक साक्षर बनविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानाचे प्रमुख जिल्हा विकास प्रबंधक गजानन मध्येश्वर यांच्या नेतृत्वात वित्तीय साक्षरता अभियान राबविले जाणार आहे.
रिझर्व बँक आणि भारत सरकारचे वित्तीय धोरणाची अंमलबजावणी करण्याकरिता बँकेचे अध्यक्ष श्री विद्युत कुडमुख्यालय नागपूर यांच्या नेतृत्वात विदर्भ कोकण ग्रामीण बँक यशस्वी वाटचाल सुरळीत पणे करीत आहे. सर्वसामान्य जनतेच्या विकासाकरिता विदर्भ कोकण ग्रामीण बँक ही आपल्या तीनशे पंचवीस शाखेमार्फत राज्यभरात कार्यरत आहे.
या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून चंद्रपूर क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय प्रबंधक रमेश खाडे, जिल्हा विकास प्रबंधक गजानन मध्येश्वर, महिला बचत गटाच्या महिला, पत्रकार उपस्थित होते.