गडचिरोली : वन्यजीव सप्ताहास उत्साहात सुरुवात

134

The गडविश्व
गडचिरोली, १ ऑक्टोबर : वनपरीक्षेत्र अधिकारी गडचिरोली (प्रादेशिक) व वनपरीक्षेत्र अधिकारी गडचिरोली (सामाजिक वनिकरण) यांच्या संयुक्त विद्यमाने आज १ ऑक्टोबर २०२२ रोजी वन्यजीव सप्ताह निमित्त जनजागृती रॅली व देखाव्यांचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम निवृत्त विभागीय वनअधिकारी शंकर बिलोलीकर यांचे हस्ते रिबीन कापून संपन्न झाला. या जनजागृती रॅलीमधे वसंत विद्यालयाचे विद्यार्थी, गडचिरोली वनपरिक्षेत्राचे कर्मचारी व सामाजिक वनविभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
यावेळी ट्रॅक्टरमध्ये वन्यप्राण्यांचा व जंगलाचा देखावा तयार करण्यात आला होता तसेच शाळेतील मुलांनी विविध वन्यप्राण्यांचे वेष धारण केले होते. पृथ्वीवरील जैवविविधता अफाट असून यावरील सर्व सजीवांना जगण्याचा अधिकार आहे. प्रत्येक प्राणी, पक्षी, कीटक इ. चे अन्न साखळीमधे विशेष महत्त्व आहे. म्हणूनच अगदी लहान फुलपाखरापासून ते मोठ्या हत्ती पर्यंत आणि अन्नसाखळीतील सर्वोच्च स्थानी असलेल्या वाघाचेही तितकेच महत्त्व आहे. सबब या वन्यप्राण्यांविषयी जनसामान्यांना ओळख होऊन त्यांचे संवर्धनासाठी दरवर्षी १ ते ७ ऑक्टोबर रोजी शासन व वनविभागामार्फत जनजागृती करण्यात येते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके व सामाजिक वनिकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी मनोज चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी लघूपाटबंधारे विभागाचे अभियंता परदेशी व सर्पमित्र अजय कुकुडकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
गडचिरोली वनविभागाचे कार्यालयात सर्व सहभागी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना वन्यजीवांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक वनिकरण परीक्षेत्र गडचिरोलीचे वनपरीक्षेत्र अधिकारी धीरज ढेंबरे व गडचिरोली वनपरिक्षेत्र (प्रादेशिक) चे वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम यांनी केले होते.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी दोन्ही परीक्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी व वनमजूर यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here