गडचिरोली मेडिकल कॉलेज ची घोषणा ; पंचतारांकित आयसीयुला मात्र अद्यापही टाळेच

504

– अगोदर आयसीयु सुरु होणार कि मेडिकल कॉलेज ? विविध चर्चाना उधाण

The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्यात यावे अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. या करीता जिल्ह्यातील आमदार, खासदार व लोकप्रतिनिधी वेळोवेळी मागणी करीत होते. सदर मागणीला यश आले असून जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणारच अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच पूर्व विदर्भात गडचिरोलीपासून दौऱ्याची सुरुवात केली यावेळी केली. मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयात कोट्यवधी रुपये खर्चून मागील दोन वर्षांपूर्वी पंचतारांकित आयसीयु दवाखान्याचे बांधकाम करण्यात आले असून सदर दवाखान्याचे लोकार्पण खुद एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री असताना केल्यानंतरही मागील दोन वर्षांपासून सदर पंचतारांकित आयसीयुला टाळे लावून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता बंद असलेले आयसीयु अगोदर सुरु होणार कि मेडिकल कॉलेज ? अशा चर्चाना उधाण आले आहे.
गडचिरोली दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा होते. यावेळी त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला. यावेळी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणारच अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून सर्वानाच आश्चर्याचा धक्काच दिला. एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडून तत्त्वता मान्यता मिळवून घेतली होती. दरम्यान गडचिरोली येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल निर्माण करण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. मात्र मुख्यमंत्र्यांनी लागलीच गडचिरोली येथे येताच आढावा बैठकीत वैद्यकीय महाविद्यालय देण्याची घोषणा केली.
मात्र एकनाथ शिंदे खुद पालकमंत्री असतांना दोन वर्षांपूर्वी लोकार्पण केलेले आयसीयू बंद असल्याने आता मात्र आधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होणार कि पंचतारांकित आयसीयू ? अशा विविध चर्चाना उधाण आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here