गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकी ‘फिक्की स्मार्ट पोलीसिंग पुरस्कार २०२१’ ने सन्मानित

182

– पोलीस दादालोरा खिडकी या योजनेच्या यशस्वी कामगिरीबद्दल कम्युनिटी पोलीसींग या श्रेणीत मिळाला पुरस्कार
The गडविश्व
गडचिरोली , ३ सप्टेंबर : जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या कार्याची दखल घेवून नुकताच भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघ (Federation of Indian Chambers of Commerce and Industry) च्या वतीने देण्यात येणारा फिक्की स्मार्ट पोलिसींग पुरस्कार २०२१ हा पुरस्कार गडचिरोली दलाच्या “पोलीस दादालोरा खिडकीला” घोषीत करण्यात आला आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी तर्फे पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांच्या वतीने सहा. पोनि. महादेव शेलार यांना काल शुक्रवार ०२ सप्टेंबर २०२२ रोजी दिल्ली येथील आयोजीत पुरस्कार सोहळ्यात ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्यामध्ये माजी केंद्रीय गृहसचिव जी. के. पिल्लई आणि बीएसएफ आणि युपीचे माजी डीजीपी प्रकाश सिंग यांच्यासह देशभरातील अनेक प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या पुरस्कारामध्ये “Community Policing” या श्रेणीतून गडचिरोली पोलीस दलाची निवड करण्यात आली आहे.
गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील वृध्द, महिला, दिव्यांग, शालेय विद्यार्थी, बेरोजगार युवक-युवती, आत्मसमर्पीत, नक्षलपिडीत तसेच आदिवासी नागरिकांच्या विकासाबाबत गांभिर्याने विचार करून गडचिरोली पोलीस दलाच्या नागरी कृती शाखेंतर्गत पोस्टे / उपपोस्टे व पोमकेंच्या ५३ ठिकाणी ‘पोलीस दादालोरा खिडकी’ सुरू केल्या आहेत. या पोलीस दादालोरा खिडकीमधून एकाच ठिकाणी नागरिकांना १) प्रोजेक्ट प्रगती अंतर्गत जात प्रमाणपत्र २) प्रोजेक्ट विकास अंतर्गत विविध प्रकारच्या योजना ३) विविध प्रकारचे दाखले ४) गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ५) व्होकेशनल ट्रेनिंग व रोजगार योजना ६) अग्निवीर ऑनलाईन अर्ज ७) प्रोजेक्ट कृषी समृध्दी ८) प्रोजेक्ट शक्ती तसेच शासनाचे इतर विविध उपक्रमाच्या माध्यमातून दोन लाखांचेवर दुर्गम व नक्षलग्रस्त भागापर्यंत पोहचून विविध योजनेचा लाभ मिळवून दिला आहे व विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन २,१४,५३८ नागरिकांना विविध शासकिय योजनांचा लाभ मिळालेला असून, प्रोजेक्ट प्रगती अंतर्गत जात प्रमाणपत्र ९,०२६, प्रोजेक्ट विकास अंतर्गत विविध प्रकारच्या योजना- ५५,३२०, विविध प्रकारचे दाखले १,२०,७०५, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना- १६९, व्होकेशनल ट्रेनिंग व रोजगार योजना- ५,६४१, अग्निवीर ऑनलाईन अर्ज – १७३, प्रोजेक्ट कृषी समृध्दी- ११,६३३, प्रोजेक्ट शक्ती- १,५४६ व इतर उपक्रम-१०,३२५ अशाप्रकारचा लाभ नागरीकांना मिळवून देण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, पोलीस दलास अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. गडचिरोली जिल्हयातील उपविभागिय पोलीस अधिकारी कार्यालय / पोस्टे/उपपोस्टे/पोमके येथील सर्व अधिकारी / अंमलदार यांनी या आव्हानांना स्विकारुन जिल्हयातील गरजु आदिवासी बांधवांपर्यंत जावुन पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन विविध शासकिय योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी परिश्रम घेवुन उत्कृष्ठ कामगिरी पार पाडली आहे. (Federation of Indian Chambers of Commerce and Industry) च्या वतीने देण्यात येणारा फिक्की स्मार्ट पोलिसींग हा पुरस्कार जाहिर झाल्यानंतर गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्यावतीने पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांनी जिल्हयातील सर्व अधिकारी / अंमलदार यांचे कौतुक केले असुन भविष्यात देखिल ते अशीच कामगिरी करतील ही अपेक्षा व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here