गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादकता वाढवून हेक्टरी ५० क्विंटल करा

391

– आमदार कृष्णा गजबे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून मागणी
The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज,१ नोव्हेंबर : अतिदुर्गम, उद्योग विरहित गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान उत्पादन घेतल्या जात असले तरी उत्पादनाच्या प्रमाणात शासकीय धान खरेदी केन्द्रावर खरेदी करण्यात येत नसल्याने येथील शेतकऱ्यांना उर्वरित धान खाजगी व्यापाऱ्यांचा विकणे क्रमप्राप्त ठरते. याचा जबर फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने शासकीय धान खरेदी करीता जिल्ह्यातील धान उत्पादकता वाढवून हेक्टरी ५० क्विंटलच्या मर्यादेत करण्याची मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मिना यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
संपूर्ण गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम व डोंगराळ भागात वसलेला असुन जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योग धंदे नसल्याने येथील नागरिकांचे जीवनमान शेती व्यवसायावर अवलंबून आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने धान पिक घेतल्या जात असले तरी यावर्षी झालेला अवकाळी पाऊस, करावी लागलेली दुबार-तिबार पेरणी, अशाही स्थितीत येथील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने धान पिक जगवले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात धान पिकाची केवळ ९.६० क्विंटल उत्पादकता ठरवल्यामुळे शेतकऱ्यांना आधारभूत धान खरेदी योजनेचा पुर्णपणे लाभ न मिळता उर्वरित धान खाजगी व्यापाऱ्यांना मिळेल त्या भावात विकावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. यामुळे शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका बसत असुन प्रसंगी उत्पादन खर्चही भरून काढणे शक्य होत नाही. लगतच्या भंडारा व गोंदिया जिल्ह्यात धान उत्पादकता वाढवून देण्यात आली असल्याने गडचिरोली जिल्ह्यात शासकीय धान खरेदीत भेदभाव केल्या जात असल्याची ओरड होत असुन यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधारभूत धान खरेदी योजनेचा पुरेसा लाभ मिळण्याच्या दृष्टीने धान पिकाची उत्पादकता वाढवून हेक्टरी ५० क्विंटलच्या मर्यादेत करण्याची मागणी आमदार गजबे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे येथील शेतकऱ्यांचे लक्ष लागुन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here