– गडचिरोली पोलिसांची धडक कारवाई
The गडविश्व
गडचिरोली : शहरातील गोकुळ नगर परिसरात अवैधरित्या गोमांस विक्री करत असलेल्या ठिकाणी धाड मारून गोमांस विक्री करणाऱ्या दाम्पत्यास स्थानिक गडचिरोली पोलिसांनी रंगेहाथ पकडल्याची कारवाई रविवार ६ मार्च रोजी सकाळच्या सुमारास केली असून आरोपी दाम्पत्यास अटक करण्यात आली आहे. अजीज याकूब कुरेशी, इरफाना अजीज याकूब कुरेशी रा. गोकुळ नगर, गडचिरोली असे अटक करण्यात आलेल्या आरोपी दाम्पत्याची नावे आहेत. कारवाई दरम्यान घटनास्थळावरून पोलिसांनी १८ किलो गोमांस जप्त केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, शहरातील गोकुळ नगर परिसरात गोमांस विक्री करत असल्याची माहिती गोरक्षकांनी स्थानिक पोलिसांना दिली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा कारवाईचे आयोजन करून धाड मारली असता घटनास्थळावरून १८ किलो गोमांस जप्त करण्यात आला. तर एक दाम्पत्य गोमांस विक्री करत असल्याचे पोलिसांना कळताच पोलीसही चक्रावले. पोलिसांनी कारवाई करत दाम्पत्यास प्राणी संरक्षक कायद्यानुसार अटक केली. दरम्यान सोमवार ७ मार्च रोजी आरोपी दाम्पत्यास न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून न्यायालय काय कारवाई करते याकडे लक्ष लागून आहे.