– प्लॅस्टिकच्या मोठ्या पन्नीत निर्जन ठिकाणी आढळला मृतदेह
The गडविश्व
नागपूर : हातपाय बांधून प्लॅस्टिकच्या मोठ्या पन्नीत निर्जन स्थळी महिला स्कूल बस कंडक्टरचा मृतदेह आढळून आल्याची घटना काल रविवारी सकाळच्या सुमारास नागपूर येथील कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.
दीपा जुगल दास (४१) असे मृत महिलेचे नाव आहे. ती समर्थनगरात राहत होती. तिचा पती स्टील कंपनीत काम करत असून तिला एक मुलगा आणि मुलगी आहे. जैन स्कूलच्या बसवर कंडक्टर म्हणून कार्यरत असलेली दीपा नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी कर्तव्यावर गेली. नंतर बेपत्ता झाली. रात्र झाली तरी ती परत आली नाही. त्यामुळे घरच्यांनी तिच्या मोबाइलवर संपर्क केला. मात्र, प्रतिसाद मिळत नव्हता. येईल परत, असे समजून तिचे कुटुंबीय झोपी गेले.
काल रविवारी सकाळी ८.३० च्या सुमारास कपिलनगरातील एसडीपीएल सोसायटी, उप्पलवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्लॅस्टिकमध्ये मृतदेह गुंडाळून असल्याचे काही जणांना आढळून आले. याबाबत माहिती कळताच कपिलनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. प्लास्टिक पन्नीत एका महिलेचा मृतदेह होता व हातपाय बांधलेले होते. मृत महिला स्कूल बसच्या वाहकाला असलेला गणवेश घालून होती. त्यामुळे तिची ओळख पटविणे सोपे गेले. शनिवारी दुपारपासून बेपत्ता झालेल्या दीपा दासचा तो मृतदेह असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
दीपाची हत्या गळा आवळून करण्यात आल्याचे मत डॉक्टरांनी प्राथमिक अहवालात नोंदवले आहे. तिला ठार मारल्यानंतर तिच्या मृतदेहाचे हातपाय बांधून तो पन्नीत गुंडाळून फेकल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तिच्यावर जबरदस्ती किंवा बलात्कार झाल्याचा संशय होता. मात्र, डॉक्टरांनी तसे काही झाल्याचे अधोरेखित केले नाही. त्यामुळे दीपाची हत्या कुणी आणि कोणत्या कारणासाठी केली, असा प्रश्न आहे.